शाहू कॉम्पलेक्स परिसरातील कृष्णा हॉस्पीटलसमोर तरूणावर चाकु हल्ला

0

जळगाव। शाहु महाराज कॉम्पलेक्सजवळील कृष्णा हॉस्पीटलसमोर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांनी एका तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर चाकु हल्ला चढविला. त्याच्या पोटावर आणि हातावर चाकू वार होताच तरूण खाली कोसळला यानंतर तेथून जाणार्‍या एका युवकाने त्याला जमीनीवर पडलेले पाहताच त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याच दहा ते पंधरा जणांनी तरूणाला रंगपंचमीच्या दिवशी काहीही कारण नसतांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.

धुलिवंदनाच्या दिवशीही केली होती मारहाण
जुना खेडी रोड येथील रहिवासी खगेश दिलीप कोल्हे (वय-19) हा तरूण पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. परंतू महाविद्यालयाला सुटी असल्याने तो जळगावात काही दिवसांपूर्वी घरी आला. सोमवारी 13 मार्चला धुलिवंदनाच्या दिवशी खगेश हा मित्रांसोबत रथचौकात आला. परंतू जैनाबाद येथील आठ ते दहा तरूण खगेश याच्या एका मित्राला शोधत त्या ठिकाणी आले आणि त्याच्या इतर मित्रांना त्या एका मित्राबाबत विचारपूस केली. खगेशसोबत असलेल्या मित्राने काय झाले अशी विचारणा केली असता त्या दहा ते पंधरा तरूणांनी त्याला काहीही न सांगता मारहाण केली. यानंतर काहीही कारण नसतांना खगेशलाही बेदम मारहाण करून पळ काढला. काही वेळातच खगेशचे मित्र आल्यानंतर त्यांनी जैनाबाद येथे जावून त्या मारहाण करणार्‍या तरूणांचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाही. यानंतर वादावर पडदा पडला.

आज बुधवारी रात्री खगेश हा पुण्याला परतणार असल्याने तो सकाळी 11 वाजेच्या सुमारास मित्राला भेटून जावे म्हणून कृष्णा हॉस्पीटल येथे कामाला असलेल्या मित्राला भेटण्यासाठी गेला. हॉस्पीटलसमोर झाडा खाली उभा राहून मित्राची वाट पाहत होता. काही वेळानंतर मित्र आल्यानंतर दोघं गप्पा मारण्यात व्यस्त झाले. यातच 11.30 वाजेच्या सुमारास धुलिवंदनाच्या दिवशी मारहाण करणारे जैनाबाद येथील दहा ते पंधरा तरूणांनी दुचाकीवरून येवून खगेशला वेढले आणि काहीही न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली त्या ठिकाणाहून त्याच्या मित्राने तेथून पळ काढला. अन् खगेश हा एकटाच सापडल्याने त्याला बेदम मारहाण केली. यात एका युवकाने त्याच्या पोटात आणि हातावर चाकु मारताच खगेश खाली कोसळला. यानंतर तरूणांनी तेथून पळ काढला. त्या ठिकाणाहून दुचाकीवरून जात असलेल्या एकाने त्याला रस्त्यावर जमखी अवस्थेत पडलेला पाहताच त्याला दुचाकीवर बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याचा उपचार करत त्याच्या कुटूंबियांना घटनेबाबत माहिती दिली. काही वेळातच खगेशच्या आई-वडीलांनी जिल्हा रूग्णालय गाठले होते.