शाहू नगरातील ५७ घरांच्या गटारींवरील अतिक्रमणावर हातोडा

0

पोलीस बंदोबस्तात कारवाई; कारवाईदरम्यान वाद झाल्याने उडाला गोंधळ

जळगाव-शाहू नगरात जवळपास 150 घरांचे अतिक्रमण असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.गटारींवर बांधकाम असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही.परिणामी सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात.त्यानुसार मंगळवारी अतिक्रमण निर्मुलन विभागाने पोलीस बंदोबस्तात 57 घरांच्या गटारींवरील अतिक्रमण काढले असून उर्वरित अतिक्रमण देखील काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांनी सांगितले.

शाहूनगरातील पोलिस चौकी ते ट्रॅफीक गार्डन पर्यंत असलेल्या गटारीवर नागरिकांनी पक्के बांधकाम केले आहे. गटरमधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीवरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उपायुक्त उक्तर्ष गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दुपारी याठिकाणी आमदार राजूमामा भोळे,महापौर सीमा भोळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कारवाईवेळी वाद

शाहूनगरात अतिक्रमण काढतांना अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी व नागरिकांमध्ये दोन वेळा वाद झाला. त्यामुळे गोंधळ झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळीे पोलिसांनी वाद मिटवला.त्यानंतर पून्हा कारवाई सुरु करण्यात आली.कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी 1 पोलिस अधिकारी, पाच पुरुष पोलिस कर्मचारी, पाच महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त होता.