शाहू फुले आंबेडकरांचा वारसा वसतीगृहांच्या निमित्ताने पुढे चालणार

0

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या पंधरवड्यात आणखी एका चांगल्या निर्णयाची भर पडली आहे. आता सामाजिक न्याय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वासातीगृहाना समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी सामाजिक न्याय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत करण्यात आली आहे.

राज्यभरात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत वसतीगृह चालवली जातात. मात्र त्यावसतीगृहांना विशेष असे कुठलेही नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे शासकीय वसतीगृह असाच उल्लेख केला जातो. त्यामुळे बऱ्याच वेळा नेमके वसतीगृह कोणते हा गोंधळ उडत असतो. पण हा गोंधळ दूर करण्यासाठी आणि त्या जिल्ह्यातील समाजसुधारकांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या वसतीगृहांचे नामकरण करण्यात येणार आहे. गठीत करण्यात आलेल्या समितीचे खुद्द सामाजिक न्याय मंत्री अध्यक्ष असून उपाध्यक्ष राज्यमंत्री, सचिव हे सदस्य आणि सहसचिव हे सदस्य असतील. वसतिगृहांना समाजसुधारकांची नावे दिल्यास त्या व्यक्तींची कार्ये वसतीगृहातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे शक्‍य होईल, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

या वासातीगृहाना समाजसुधारकांची नावे दिल्यामुळे शाहू, फुले आंबेडकरांचा वारसा या निमित्ताने पुढे चालवला जाईल असे मत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. समाजसुधारकांचा समतेचा विचार या निमित्ताने विद्यार्थ्यापर्यंत पोहचवावा हा या निर्णयाचा एक उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.