शाहू, फुले, आंबेडकर, गांधींच्या वारशाला माध्यमे विसरली

0

पुणे । प्रत्येक गोष्टीत द्वेष कसा पसरवला जाईल यावर सध्या भर दिला जात असून माध्यमे शाहू, फुले, आंबेडकर, गांधींच्या वारशाला विसरली आहेत, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले. सध्या माध्यमांच्या नीतीवर तीव्र ताशेरे ओढले. आजच्या काळातले धर्मगुरू हे मार्केटिंग गुरु झाले आहेत. निर्मल बाबासारख्या व्यक्तीने 500 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेला जेवढी प्रसिद्धी दिली गेली तेवढी दाभोलकरांच्या चळवळीला मिळाली नसल्याचे त्यांनी खेदाने नमूद केले. नामांकित स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि कॉम्रेड पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी न्यायालयीन पातळीवर आमची लढाई अनेक वर्ष सुरू असणार असल्याची आम्हाला जाणीव असल्याचे स्पष्ट केले. पुढील काळात फरार गुन्हेगार सापडतील की नाही हे माहिती नाही पण विचारांचे खून घडवणार्‍यांना मात्र आम्ही उत्तर देऊ शकल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

डॉ हमीद दाभोलकर यांनी आपले विचार व्यक्त करताना गेल्या चार वर्षात अंनिसने दिलेले सर्व लढे हे संविधानाच्या चौकटीत राहून दिल्याचे आवर्जून नमूद केले. कोणी एखादी क्रिया केली म्हणून त्यांना प्रतिक्रिया द्यायची ही अंनिसची भूमिका कधीच नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले.न्यायालयीन लढ्यासोबत समाज अधिकाधिक विवेकवादी व्हावा म्हणून कायम कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पावसातही निषेध फेरीला चांगला प्रतिसाद
डॉ दाभोलकर यांची हत्या झालेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून सकाळी निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे किती कार्यकर्ते उपस्थित राहतील, याबाबतची शंका व्यक्त करण्यात येत होती. पण मागील वर्षापेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते भर पावसात निषेध फेरीमध्ये सामील झाल्याचे दृश्य बघायला मिळाले.

“जबाब दो”ट्विटरवर ट्रेंड
अंनिसच्या वतीने दाभोलकरांना कोणी मारलं या सवालासह जबाब दो” हा हॅशटॅग सोशल मीडियावर चालवण्यात येत होते. त्याला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी हा हॅशटॅग वापरला. दिवसाअखेर हा सर्वाधिक वापरलेल्या ट्रेंड यादीमध्ये या हॅशटॅगचा समावेश झाला होता.