शाहू साकारताना युवा रंगकर्णीचा रंगमचावरच मृत्यू

0

पुणे : राज्य सरकारच्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान ’अग्निदिव्य’ या नाटकात प्रमुख भूमिकेतील साकारणारे युवा रंगकर्मी सागर चौगुले (वय 38) यांचा टिळक स्मारक मंदिरात प्रयोग सुरू असताना रंगमंचावरच शुक्रवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे नाट्यगृहात खळबळ उडाली.

या नाटकात चौगुले यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकार करत होते. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांचे चौगुले भाचे होत. त्यांचे वडिल शांताराम चौगुले मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून परिचित होते. सागर चौगुले यांच्या मागे आई, पत्नी, दीड वर्षांची मुलगी, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे.

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजिलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौगुले यांच्या संघाचे ’अग्निदिव्य’ नाटकाचे सादरीकरण सुरू होते. प्रयोगात चौगुले यांचा तिसरा प्रवेश झाल्यानंतर काही वेळातच ते अचानक रंगमंचावरच कोसळले. सहकलाकारांनी चौगुले यांच्याकडे धाव घेत, त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रेक्षकांतील एका डॉक्टरांनी चौगुले यांच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, चौगुले यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जवळच्या पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चौगुले यांच्या निधनाची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर कलाकारांनी हंबरडा फोडला

चौगुले मूळचे कोल्हापूरचे असून, गेल्या अनेक वर्षांपासून तेथील हृदयस्पर्श सांस्कृतिक व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. या व्यासपीठानेच अग्निदिव्य’ नाटकाची निर्मिती केली आहे. प्राथमिक फेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी चौगुले यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले होते. सागर चौगुले यांनी काही चित्रपटांतही भूमिका केल्या होत्या. सासू आली अडचण झाली हा त्यांचा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.