खिर्डी । येथून जवळच असलेले शिंगाडी येथील कर्जबाजारी शेतकरी प्रभाकर नामदेव पाटील (वय-60) यांनी 6 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान तापी नदीपात्रात आत्महत्या केली. लुमखेडा ता. रावेर येथील पोलीस पाटील चम्पालाल पाटील यांनी सावदा पोलीस खबर दिली की, तापी नदीपात्रात लुमखेडा शिवारात नदीच्या काठावर मृत्तदेह बेवारस पडलेला आहे.
सोसायटीतून 50 हजारांचे घेतले होते कर्ज
तरी सावदा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास केला असता 8 रोजी त्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह शिंगाडी ता रावेर येथील प्रभाकर पाटील यांचा होता. ते शिंगाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे शिंगाडी येथे संचालक होते. त्यांनी शेतीसाठी सोसायटीतुन 50 हजार रूपये कर्ज घेतले होते. 50 हजारांच्या थकबाकीमुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते.त्यामुळे ते तणावात राहत होते.त्यांची दोन तरुण मुलांचा आधीच मृत्यु झाला होता. त्यांच्या जवळ दीड एकर होती. ज्यांच्यात ते शेती करत होते. अखेर कर्जाच्या ताणाने त्यांनी लूमखेडा शिवारातील हतनूर धरणाजवळ तापी नदीपात्रात आत्महत्या करीत आपली जीवन संपविली त्यांचे पश्चात पत्नी, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश भालेराव हे करीत आहे.