शिंदखेडा। गरजू जनतेला माफक दरात जेवण मिळावे या हेतूने महाविकास आघाडी सरकारने राज्यात शिवभोजन योजना कार्यान्वित करुन तालुका स्तरावर शिवभोजन केंद्रांची निर्मिती केली आहे. त्याच धर्तीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावात अनमोल स्वागत शिवभोजन केंद्राला मान्यता मिळाली असून २ एप्रिलपासून शिवभोजन केंद्राला सुरुवात झाली आहे.दुपारी 12 ते 2 या वेळेत पहिल्या पंच्याहत्तर लोकांना हे शिवभोजनाचा लाभ घेता येत आहे. लॉकडाउनच्या काळात जेवण अवघ्या पाच रुपयात उपलब्ध होणार आहे. या शिवभोजन केंद्राला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना विषाणूच्या खबरदारीने अवघा देश लॉकडाउन असल्यामूळे गरजू जनतेला जेवणाची सोय व्हावी म्हणून राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या विभागामार्फत ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात आली. योजनेचा शुभारंभ स्टेशन रोडवर असलेल्या केसरानंद कॉम्प्लेक्समधील हॉटेल अनमोल स्वागत येथे करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिवभोजनचे संचालक प्रविण पाटील, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, शिवभोजनचे लाभार्थी उपस्थित होते.