धुळे : एनआरएचएम अंतर्गत केलेल्या कामाच्या मानधनाचे 17 हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्या शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्यासह नरडाणा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यास धुळे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता लाच स्वीकारताच अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण पंडित मोरे (34, हल्ली मु.भोई गल्ली, वर्षी, ता.शिंदखेडा) व नरडाणा वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज बारकू वाडेकर (41, दत्त कॉलनी, साई मंदिराजवळ, देवपूर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोग्य विभागाच्या कर्मचार्याकडेच मागितली लाच
तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र, नरडाणा येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी एनआरएचएम अंतर्गत केलेल्या कामांचे मानधनाचे 17 हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण मोरे व नरडाणा वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज बारकू वाडेकर यांनी प्रत्येकी एक हजारांची लाच 23 जुलै रोजी मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. धुळे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच सापळा रचला होता. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास नरडाणा वैद्यकीय अधिकार्यांच्या निवासस्थानी संशयीत आरोपींनी प्रत्येकी एक हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक झोडगे, राजन कदम, शरद काटके, जयंत साळवे, संतोष पावरा, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, कैलास जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे, गायत्री पाटील, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.