शिंदखेडा । महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक 34 हजार कोटी रक्कमेची कर्जमाफी देतांना तातडीने 10 हजार रूपयांची उचल देण्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. मात्र आपल्या बँकेच्या विविध शाखांत उचल मागणीसाठी जाणार्या शेतकर्यांना विपरीत अनुभव येत आहे. बँकेकडे निधी शिल्लक नसल्याचे कारण दाखवून शेतकर्यांना परत पाठविले जात आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश केलेले असतांनाही आपल्या बँकेेने शेतकर्यांना रूपये 10 हजार उचल न देण्याचे धोरण स्विकारले आहे तरी शिंदखेडा तालुक्यातील व दोंडाईचा शहरातील शेतकर्यांना रूपये 10 हजार उचल देण्यात यावे असे निवेदन शिंदखेडा येथील तहसिलदार व जिल्हा बॅकेचे शाखाधिकारी यांना शिंदखेडा तालुक्याचा वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी , जिल्हा सरचिटणीस कामराज निकम, तालुकाध्यक्ष नथ्थु पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता आपण शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तसेच जिल्हा बँकेवर काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने सूड भावनेतून राज्यातील सत्तारूढ भाजपा शासनाची पायमल्ली केली जात असल्याचे म्हटले आहे. निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धिरेंद्र सिसोदिया, जिल्हा चिटणीस दरबारसिंग गिरासे, सौ संजीवनी सिसोदिया,दिपक चौधरी,डॉ नितिन चौधरी, किरण चौधरी आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.