शिंदखेडा तालुक्यात राजकीय क्षेत्रात महिला राज

0

शिंदखेडा (प्रा. अजय बोरदे) । सार्वजनिक क्षेत्रामध्ये पुरूषांचे वर्चस्व असले तरी ‘चुल आणि मुल’ ही चौकट मोडून स्त्रीयांनी आपल्या योग्य कार्यपद्धती आणि नियोजनामुळे स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात पुरूषांपेक्षा मागे नाहीत हे सिद्ध केले आहे. तालुक्याची धुरादेखील अशाच स्त्रियांच्या हातामध्ये आहे. पंचायत समितीच्या सभापती सुनंदा नरेंद्रकुमार गिरासे, उपसभापती सुनिता विश्‍वनाथ पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील गोर-गरीब कुटूंबातील स्यियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदेखडा गावाची ‘खेडे’ ही प्रतिमा बदलून शहर निर्माण करण्यासाठी नगरपंचायतीची धुरा देखील शहनाज बशीर बागवान यांच्या हाती आहे. शहरासह तालुक्यात सार्वजनीक क्षेत्रात या महिलांनी कार्यांमुळे आपली योग्यता सिद्ध केली आहे.

सभापती सुनंदा गिरासे
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली करून दिल्यानंतर पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांनी शिक्षणाला महत्व दिले. शासनाने देखील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या. त्याचाच परीणाम म्हणून आजची स्त्री शिक्षण घेवून पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभी आहे. किंबहूना पुरूषांपेक्षा सरस ठरत आहे. शासनाचे तालुकास्तरावरील मंत्रालय म्हणजे पंचायत समितीची धुरा सभापती सुनंदा नरेंद्रकुमार गिरासेे यांनी समर्थपणे आपल्या खाद्यांवर घेतली आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सौ. गिरासे राजकारणातून समाजकारण करणची इच्छा मनात घेवून मेयी गणातून पंचायत समिती निवडणूक लढविली आणि निवडून आल्यात. राहेयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या विचारांनी प्रेरीत होवून गरीबांना न्याय देण्याची शपथ सौ. गिरासे यांनी घेतली. त्यांच्या या धडपडीला त्यांचे पती नरेंद्र गिरासे यांची उत्तम साथ मिळाली आहे. 21 जून 2016 मध्ये सभापतीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तालुक्यातील गोर, गरीब महिलांच्या कुटुंबांना शासकीय मदतीचा हात दिला.

तालुक्यात शेतकरी आणि शेतमजूर कुटुंब अधिक आहेत. त्यांच्या आर्थिकस्तर उंचविण्यासाठी शेतीसाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कामांचे नियोजन केले. आणि त्या कामांना कागावरच न ठेवता मुर्त स्वरूप दिले. शासनाच्या पाणलोट विकास योजनेतून कृषी विभागामार्फेत नाला खोलीकरण आणि जलशिवार योजनतेअंतर्गत पाणी अडविण्यासाठी शेततळे व गावतळ्यांसारखी कामे हाती घेतली आहेत. महिला बचत गटाद्वारे कार्य : मेधी गणात 200 बंधार्‍यांचे खोलीकरण आणि स्थानिकस्तर योजनेतून पन्नास सिमेंट नाला बंधार्‍यांची कामे सुरू आहेत. सौ. गिरासे या मेधी सारख्या खेडेगावांतून येत असल्यामुळे ग्रामीण स्त्रियांच्या आर्थिक क्षमतेची कल्पना होती. तालुक्यात गावागावात बचत गट निर्माण करण्यावर त्यांचाभर आहे. बचत गटांमुळे तालुक्यांतील स्त्रियांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. शासनाच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीच्या असलेल्या योजना राबविण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी व लोकप्रतिनीधींकडे त्या आग्रह देखील धरतात. त्यांच्या सोबत वीस सदस्य असलेल्या पंचायत समितीत सरला दिपक बोरसे, भाग्यश्री चंद्रकांत बागल, संजीवनी संजय सिसोदे, सपना ललीत वारडे या महिला सदस्यांनी आपापल्या मतदार संघात विकास कामांच्या माध्यमातून आपली छाप निर्माण केली आहे.

उपसभापती सुनिता पाटील
पंचायत समितीच्या माजी सभापती व सेनेच्या विद्यमान उपसभापती सुनिता विश्‍वनाथ पाटील यांनी आपल्या कार्यकाळात शेतकर्‍यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात सुमारे दोन हजार विहीरींची मंजूरी दिली. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण केली. याशिवाय महिलांविषयक योजनांमध्ये घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, जवाहर योजना आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यांसाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. सुनिता पाटील ह्या शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्‍वनाथ पाटील यांच्या पत्नी आहेत. कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजरकण व 20 टक्के राजकारण या विचाराने प्रेरीत होवून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सभापती आणि उपसभापतीपदाची संधी मिळताच महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी या संधीचा उपयोग केला.

शहनाज बागवान
शिंदखेडा नगर पंचायतीची धुरा देखील शहनाज बशीर बागवान यांच्या हातात आहे. शहनाज बागवान यांनी गटनेते अनिल वानखेडे, प्रा. सुरेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध विकासाची कामे सुरू केली आहेत. शहरातील महत्वाच्या पाणीप्रश्‍नांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. येत्या काळात पाणटंचाई निर्माण होणार नाही यासाठी बागवान यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन केले आहे. शहरात कचरा व रस्त्यांची समस्या भेडसावत आहे. यासाठी कचरा संकलनासाठी विभागवार वाहनांची व्यवस्था केली आहे. तसेच अनेक भागांमध्ये सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या नियोजनामध्ये बागवान यांना उपनगराध्यक्ष दिपक देसले, उल्हास देशमुख व सर्वच नगरसेवकांचे सहकार्य मिळत आहे.

याशिवाय तालुक्यातील 142 गावांपैकी अनेक गावांमध्ये महिलांकडे सरपंचपद आहे. सरपंचपदाची धूरा सांभाळत असतांना कुटुंबाची जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडत आहेत. तालुक्यात लोकप्रतिनीधी म्हणून या महिलांनी दिलेले योगदान निश्‍चितच तालुक्याला विकासाकडे नेण्यासाठी महत्वाचे ठरेल.