शिंदखेडा । येथील नगरपंचायत प्रशासनाला दुसर्या मासिक सभेत अजेंड्यावरील त्रूटीमुळे फक्त 5 दिवसांच्या अंतराने दोन सभा घेण्याची नामुष्की आली आहे. 9 मार्च रोजी होणारी सभा विरोधकांच्या तीव्र हरकतीने रद्द करावी लागली. या वातावरणात येणारा 5 वर्षांचा काळ हा विरोधकांना विश्वासात घेतले नाही तर काय होऊ शकते, याची झलक नागरिकांना दिसून आली आहे. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये अनिल वानखेडे यांच्या गटाचे 9 तर विरोधी गटात 8 सदस्यांचा समावेश शिंदखेडा नगरपंचायतीत 2 सभा घेण्याची नामुष्की आहे. अटीतटीच्या या संख्याबळामध्ये अनुभवी राजकारणी विजयसिंग राजपूत यांचा समावेश विरोधी गटात आहे.
सत्ताधारी, विरोधाकांत समन्वय आवश्यक
नेमका हाच मुद्दा सत्ताधारी गटाला निटपणे हाताळता येणे गरजेचे आहे. एका सभेमध्ये किती विषयांचा समावेश असावा आणि मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, मागील सभेचे इतिवृत्त मागेल त्याला सदस्याला देणे या तांत्रिक बाबी असल्या तरी 57 विषयांपैकी एकाही विषयासाठी विरोधकांना विश्वासात घेतले नाही, हा खरा मुद्दा आहे. अनिल वानखेडे 15 वर्षांपासूनशिंदखेड्याच्या राजकारणात आहेत. पाणी योजना यासह स्मार्ट सिटीसारख्या आकर्षक आश्वासनांची पूर्तता करणे हा त्यांचा 5 वर्षांचा अजेंडा आहे. मात्र, प्रारंभीच असा प्रसंग ओढवणे त्यांना परवडणारे नाही. भविष्यात यांच्याद्वारे करावयाच्या विकासकामांसाठी सर्व सदस्यांची एकत्र सांगड घालणे त्यांना गरजेचे आहे.