शिंदखेडा । महाराष्ट्र स्थापना दिवसाचे औचित्य साधून शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये कचरा विलगीकरण मोहिमेचे उद्घाटन माजी पं.स.सभापती प्रा.सुरेश देसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारीतोषिक देवून गौरविण्यात आले. तपूर्वी नगराध्यक्षा शहनाज बागवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिंदखेडा शहरात कचरा निर्मूलन ही मोठी समस्या आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी कचरा विलगीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात येत आहेत.
अग्निशमन गाडी व शववाहिनी येणार
1 जुलैपासून विविध सामाजिक संघटना व बँकांच्या सहकार्याने एस. आर. फंडातून कचराकुंड्या उपलब्ध करून वाटप करण्यात येईल. तसेच येत्या महिनाभरात शिंदखेडेकरांच्या सेवेत अग्निशमन गाडी व शववाहिनी दाखल होत असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली. ज्येष्ठ नागरीक तसेच महिलांचा विरंगुळा व्हावा यासाठी बसस्थानकासमोरील सरस्वती कॉलनी परीसरात मोकळ्या जागेत संरक्षक भिंत उभारून जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. 20 एप्रिल हा दिवस नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. यानिमित्त स्वच्छता अभियान, महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन, कर्मचा-यांना प्रशासकिय कामकाजाविषयी माहिती यांसारख्या कार्यक्रमांसोबतच ’स्वच्छ शहर सुंदर शहर’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता परीक्षक म्हणून प्रा.सी.डी.डागा यांनी काम पाहिले. विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास गटनेते अनिल वानखेडे ,उपनगराध्यक्ष दिपक देसले, बांधकाम सभापती उल्हास देशमुख,नगरसेवक मथूराबाई मराठे, चंद्रसिंग राजपूत,निंबाजी सोनवणे,अशोक देसले, नामदेव भिल,राकेश महिरे,मुख्याधिकारी अजित निकत उपस्थित होते. या स्पर्धेत जान्हवी बोरसे प्रथम, रोहीणी साळुंखे व्दितीय तर मानसी चौधरीने तृतीय क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विवेक डांगरीकर यांनी केले.