शिंदखेडा। शहराच्या बहुचर्चित कायमस्वरूपी पाणी योजनेचे भूमीपूजन 22 रोजी रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. विरदेल रोड लगत साईलीलानगर मध्ये संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 7 वाजता गांधी चौकात मंत्री रावल यांची जाहीर सभा होणार आहे. दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे ई-उद्घाटन केले होते. आता प्रत्यक्षरित्या योजनेचे भूमीपूजन होईल. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रा. सुरेश देसले, अनिल वानखेडे, कामराज निकम, नारायण बाजीराव पाटील, दिपक देसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे.
जूनपर्यंत शहरात पोहोचणार पाणी
गेल्या काही वर्षात शहराची पाणीटंचाई तीव्र झाली होती. परीणामी नागरिकांचे हाल होत होते. शहराला सूलवाडे बॅरेज येथून पाणीपुरवठा करणारी कायम स्वरूपी योजना असावी अशी गेल्या 15 वर्षापूर्वीपासूनची मागणी होती. शेवटी या योजनेसाठी शहरातील दोन्ही राजकीय गट एकत्र आले. मंत्री रावल यांचेकडे या योजनेसाठी हट्ट धरला. रावल यांनीही यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळवून दिली. 21 कोटी रूपये खर्चाची ही योजना असून त्यापैकी सहा कोटी 70 लाख रूपयांचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे. यापैकी एक कोटी साठ लाख रूपये लोकवर्गणी भरण्यात आली आहे. पुणे येथील तेजस कन्सट्रक्शन यांना या कामाचा ठेका देण्यात आला आहे. येत्या जूनपर्यंत शहरात पाणी पोहोचेल आणि पाईपलाईन आणि जलकुंभाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.