शिंदखेडा (प्रा.अजय बोरदे) । अनियमित बस सेवा, अपूरी चालक वाहक संख्या, कायमस्वरूपी बंद असलेली पाण्याची टाकी, जुन्या खटारा झालेल्या गाडया, लांब पल्ल्यांच्या गाडयांचा अभाव, बसस्थानकातील मोकळया जागेत होत असलेले अतिक्रमण, मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसलेले अधिकारी व कर्मचारी या सारख्या असंख्य कारणांमुळे शिंदखेडा बसस्थानक समस्यांचे माहेर घर बनले आहे. समस्या सोडविण्यासाठी आगार प्रमुख व कर्मचा-यांचे शर्थीचे प्रयत्न अपूर्ण पडत असल्याने आगाराचा दर महिन्याचा तोटा देखील वाढत आहे. दर महिन्याचा तोटा 45 लाख रूपये आहे. शिंदखेडा शहर हे चाळीस हजार लोकवस्तीचे तालुक्याचे ठिकाण. परिसरातील पन्नास पेक्षा अधिक गावे या शहराला जोडली गेली आहेत. या गावातील नागरिकांना बससेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रवाशांना सुखकर व सहजपणे प्रवास करता यावा यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्या वेळापत्रकाची दुर्दशा तर झाली आहे, परंतू वेळापत्रकानुसार एकही गाडी धावत नाही. चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशाला ’येईल ना गाडी, वाट बघा’ ड्रायव्हर नाही, कंडक्टर नाही अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.
परिसरात घाणीचे साम्राज्य
बसस्थानकाचे बांधकाम होऊन कित्येक वर्ष उलटून सुध्दा स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य असून यामुळे प्रवासी विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानक परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बस स्थानकात प्रवेश करते वेळी सर्वत्र धुळ उडते. स्थानक परिसरात महिलांचे शौचालय बांधकाम केले असुन नावापुरते आहे. पुरूषांचे शौचालय सुध्दा नावापुरते असुन शौचालयाची साफसफाई होणे गरजेचे आहे. सफाई कामगार नसल्यामुळे शौचालयात बाहेर सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.
गाळ्यांचा घोळ मिटेना : बसस्थानकाच्या इमारतीत 7 ते 8 व्यापारी गाळे आहेत. त्यातील एकाच गाळयामध्ये हॉटेल सुरू आहे. यापूर्वी हे गाळे पेपर न्यूज एजन्सी, फुटाणे विक्री करणा-या व्यवसायिकाला भाडे तत्वावर देण्यात आले होते. अनेक वर्षापासून हे व्यावसायिक तेथे व्यवसाय करीत होते. परंतू मंडळाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी अव्वाच्यासव्वा भाडेवाढीची भूमिका घेतल्याने हे गाळे गेल्या सात-आठ वर्षापासून रिकामे आहेत. गाळे रिकामे असतांना आवारातच नविन व्यापारी गाळे उभारणीसाठी परवानगी दिलीच कशी जाते ? या बाबत उलट सूलट चर्चा सुरू आहे. अधिका-यांच्या या भूमिकेमुळे आवारात अतिक्रमण झाले तर नवल वाटण्याचे कारण नाही. या गाळयांचे टेंडर काढण्याचे अधिकार विभागीय अधिकार्यांना आहे. अधिका-याच्या आडमूठे धोरणामुळे आगाराचे उत्पन्न बुडत आहे.
कर्मचारी कमी असल्याने अडचणीत वाढ
अनेकवेळा एकाच मार्गावर एकपेक्षा अधिक गाडया या आगारातून सोडल्या जातात. त्यामुळे पुरेश्या प्रवासी संख्येअभावी ब-याच वेळा गाडया रिकाम्या देखील जातात तर दुसरीकडे प्रवाशांना तासनतास गाडीची वाट पाहत ताटकळत बसस्थानकावर थांबावे लागते. सगळ्यात अधिक अडचण धुळे मार्गावर धावणार्या गाडयांच्या बाबतीत अधिक आहे. मात्र प्रवाशांच्या या अडचणीकडे वरीष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. गाडीची उपलब्धता नसणे, कधी वाहक तर कधी चालक नसणे ही कारणे देखील बसेस उशिरा धावण्यासाठी कारणीभूत आहेत. शिंदखेडा आगारातून दिवसाला साधारणतः 45 फेर्या होतात. त्यासाठी 45 वाहक व चालक आवश्यक आहेत. आगारामध्ये 11 वाहक व 11 चालक कमी आहेत. कधी वाहक असतो तर चालक नसतो, कधी चालक असतो तर वाहक नसतो पर्यायाने त्रास हा प्रवाशांनाच सहन करावा लागत आहे. याकडे परिवहन विभागाच्या अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
कायमस्वरूपी पाणी व्यवस्थेची गरज
बसस्थानकात सुमारे पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची सिमेंटची टाकी आहे. मात्र अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. आवारात कूपनलिका केली आहे. परंतू पाणी क्षारयुक्त असल्याने पिण्यायोग्य नाही. नगर पंचायतीचे नळ कनेक्शन आहे मात्र पाणीच येत नसल्याने तेही बंद अवस्थेतच आहे. उन्हाळयाच्या दिवसात दाते शोधून तात्पूरती पाण्याची व्यवस्था केली जाते. सद्यःस्थितीत जयलक्ष्मी प्रोव्हीजनच्या सहकार्याने पाणपोई सुरू आहे. पण त्यासाठी लागणारे पाणी टँकरने आणले जाते. टँकरचा खर्च शिंदखेडा आगारातर्फे केला जात आहे.
लांबपल्ल्यांच्या गाड्यांविषयी खुलासा नाही
आगारातून बोरीवली, शिर्डी, पूणे, अकोला, ठाणे, सूरत या लांब पल्याच्या गाडया सुरू आहेत. लांब पल्याच्या गाडया सुरू झाल्याबाबत जागृती प्रवाशांमध्ये केली जात नसल्याने प्रवाशांअभावी गाडया नियमित होण्याऐवजी बंद कराव्या लागतात. यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. आगारातून बसेस वेळेवर सोडण्यास प्राधान्य दिले जाते. वाहक-चालकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असली तरी प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यावरच आमचा भर आहे. धुळे मार्गावरील बसेसचा प्रवास नियमित करणेसाठी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. आगारातील विवीध अडचणींच्या बाबतीत वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.- ए.आर.चौरे, आगार प्रमुख आगारातून सुटणा-या बसेस वेळेपेक्षा उशिरा सुटतात. बसची वाट पाहात उभे राहावे लागते. वेळ वाट पाहिल्यावर एकापाठोपाठ दोन तीन बसेस येतात. कोणत्या बस मध्ये बसावे असा प्रश्न प्रवाशाला पडतो. वेळापत्रक केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.- प्रा.जी.पी.शास्त्री, प्रवासी शौचालयाची दूरावस्था बसस्थानक आवारात असलेल्या शौचालयाची दूरावस्था झाली आहे. महिलांचे व पुरुषांचे शौचालयाचे प्रत्येकी दोन यूनिट आहे. या यूनिटच्या आतील भिंती अतिशय खराब झाल्या आहेत. दरवाजे देखील तूटले आहेत. शौचालयाला जातांना ओळखीच्या व्यक्तिला सोबत नेऊन बाहेर उभे करावे लागते, अशी अवस्था आहे. बसस्थानकाचे आवार मोठे असल्याने आवारातच उघडयावर शौच करणा-यांची संख्या अधिक आहे. परिणामतः आवारात दुर्गंधी पसरते. शौचालयाची व्यवस्था असूनही कर्मचारी व प्रवाशी देखील इमारतीच्या जिन्याखाली असलेल्या जागेचा वापर शौचालय म्हणून करतात. दुर्गंधीयुक्त पाणी आवारातच वाहत असते.
प्रवाशांचे होताहेत हाल
प्रवाशांना बसस्थानकात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. उन, वारा, पाऊस असो तासनतास उभे राहुनच गाडीची वाट बघावी लागते. धुळयाहुन शिंदखेडा येथे येण्यासाठी प्रवाशांचे अतोनात हाल होतात. धुळयाहून शिंदखेडा येथे परत येण्यासाठी रात्री आठला शेवटची बस आहे .त्यानंतर बस आहे का?याची चौकशी केली असता शिंदखेडा आगाराच्या बसेसची कोणतीही नोंद धुळे बसस्थानकाच्या चौकशी कक्षात आढळत नाही. बस नाही असे सांगून अधिकारी मोकळे होतात. धुळे बसस्थानकावर बसेस् उभ्या करण्यासाठी निश्चित अशी जागा आहे. शिंदखेडा डेपोतील वाहक -चालक मात्र याबाबत मनमानी करतात असा प्रवाशांचा अनुभव आहे. या बाबत अधिका-यांनी लक्ष घालावे अशी प्रवाशांची आहे.