शिंदखेडा। येथील वसंत हिलाल राजपूत यांनी सन 2016च्या युपीएससीच्या अंतिम परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर 325वा रँकींग मिळविला आहे. ते माजी मुख्याध्यापक हिलाल कृष्णा राजपूत यांचे सुपत्र आहेत. वसंत यांचे वडील हिलाल राजपूत शिंदखेडा तालुक्यातील वरपाडा येथे वास्त्यव्यास आहेत. त्यांनी नोकरीत सुरूवातीला पगार नसतांना मुलांचे शिक्षण शिवणकाम करून पूर्ण केले. वसंत यांचे प्राथमिकशिक्षण वरपाडा येथे झाले आहे. तर 5वीचे शिक्षण किसान हायस्कूल शिंदखेडा येथे झाले. यानंतर वसंत यांनी नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होवून 6वीपासून अक्कलकुआ येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यांतील खेडगाव येथे 11वी व 12वीचे शिक्षण घेतले. यानंतर पुणे येथील बी.जे. मेडीकल कॉलेजला प्रवेश घेवून 2005 साली एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनले. डॉक्टर बनल्यावरही त्यावर समाधानी न राहता वसंत यांनी वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले. यानुसार युपीएससीची परीक्षेत जिद्दीने अभ्यास करून देशात 325वी रँक मिळवून उत्तीर्ण केली. त्यांच्या यशामागे त्यांच्या जिद्दी सोबतच वडील हिलाल राजपूत व आई मिराबाई राजपूत यांचे मोठे योगदान आहे. युपीएससीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षे उत्तीर्ण होवून शिंदखेड्याचे नाव देशात उंचावल्याने शहर तसेच परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
माझ्या अथक परिश्रमाने व त्यावेळची गरिबीची जाणीव ठेवून माझ्या मुलाने आज येवढे मोठ्या जिद्दीने यश संपादन केल्याने मला त्याचा अभिमान आहे.
हिलाल राजपूत, वडील
माझ्या आई-वडीलांच्या अथक प्रयत्नामुळे मिळलेले हे यश त्यांना अर्पण करीत आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वडीलांनी माझ्यासाठी खुप मेहनत घेतली. त्यांचे उपकार फेडू शकत नसलो तरी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न यश संपादन करून करीत आहे. त्यांचे आर्शीवाद कायम पाठशी रहावे व मी त्यांना विसरणार नाही.
वसंत राजपूत