शिंदखेडा । ग्राहकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकांसाठी केलेल्या योगदानातून प्रेरणा घेवून बारा वर्षापूर्वी शहरात ग्राहक पंचायतीची शाखा सुरू करण्यात आली. शिंदखेडा शाखेने तालूक्यातील विविध प्रश्नांचा पाठपूरावा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच विविध स्पर्धा घेवून ग्राहक पंचायतीचा उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. गेल्या बारा वर्षापासून हे काम अविरत सुरू आहे. सद्यःस्थितीत हि शाखा महाराष्ट्र ग्राहक पंचायतीशी निगडीत आहे. तालूका संघटक म्हणून प्रा.चंद्रकांत डागा आहेत. तालूक्यात ग्राहक पंचायतीचे कार्य रूजविण्याची धूरा त्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे उचलली आहे. यासाठी सोळा शिलेदारांची टिम असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. सोनगीर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय शिबिराच्या निमीत्ताने ‘दैनिक जनशक्ति’ने घेतलेल्या कामांचा आढावा.
बारा वर्षे काम केल्याची मिळाली पावती
शहरात ग्राहक पंचायतीची शाखा सुरू झाल्यानंतर अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. आपण कोणत्याही पद्धतीन ग्राहक बनून जातो यांची जाणीव ठेवून अनेकवेळा दुकानदाराकडून फसवणूक होते. त्याबाबत त्याला वेळा अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. व्यापारी व दुकानदारांकडून होणारी लूटमार व फसवणूकीवर आळा बसावा यासाठी बारावर्षापुर्वी शहरात ग्राहक पंचायतीची शाखा सुरू करण्यात आली. या शाखेच्या माध्यमातून अनेकांनी तक्रार देण्यास सुरूवात केल्या. आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्ती व विभाग यांची विचार पुस करून ग्राहकाला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा केला आणि ग्राहकांना न्याय मिळवून दिलेला आहे. गेल्या बारावर्षापासून शाखेचे अविरत कार्य समर्थपणे पार पडत आहे. त्यांच्या कामामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
जनजागृतीसाठी शहरात विविध कार्यक्रम
विविध वस्तू खरेदीमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते हे लक्षात आल्याने ग्राहक पंचायतीशी जोडून घेतले. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने महिलांमध्ये ग्राहक म्हणून काळजी घेण्याविषयी जनजागृती करीत आहे. महिलांची भिसी, हळदीकूंकू आदि कार्यक्रमांमध्ये जावून आर्वजून माहिती सांगून महिलांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे छाया पवार यांनी सांगितले. शहरातील व्यापारी संजय पारख बोलतांना सांगितले की, व्यापारी हा देखील एक ग्राहक आहे. विविध वस्तू खरेदी करतांना आमचीही फसवणूक होते. माझ्यासह इतरांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक पंचायत उत्कृष्ट कार्य करीत आहे. इतर व्यापार्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी प्रबोधनपर शिबीर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. तर वृत्तपत्र हे सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले प्रसिध्दि माध्यम आहे.याव्दारे ग्राहकांच्या तक्रारी निवारण्यासाठी ग्राहक पंचायतीचे कामहाती घेतले आहे अशी माहिती पत्रकार जितेंद्र मेखे यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.
शिंदखेडा शाखेची कार्यकारणी व केलेली कामे
तालुका संघटक प्रा.चंद्रकांत डागा, सहसंघटक छाया पवार, रविंद्र ठाकूर, कोषाध्यक्ष प्रा.गजानन शास्त्री, सहकोषाध्यक्ष प्रा.योगेंद्र सनेर, सचिव प्रा.भिमराव कढरे, प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र मेखे, अॅड.वसंतराव भामरे, विजया वाघ, प्रा.अजय बोरदे, माधवराव देसले, प्रा.प्रदिप दिक्षीत, संजय पारख, प्रा.पी.टी.पाटिल, प्रा.भैय्या मंगळे, जयश्री निकम यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात मुंबई, पूणे जाणार्या ट्रव्हल्सची मनमानी भाडे आकारणी, शहरातील संशयास्पद दूचाकीच्या नेमप्लेट, धांदरणे येथे बस सुरू करणे, रेल्वे गेट बंदमुळे येणार्या अडचणी, रेल्वे गाडयांना शिंदखेडा स्थानकावर थांबा मिळावा, यासारख्या आदी प्रश्नांबाबत संबंधित विभागाला निवेदन देवून कामे केली आहे.
आजच्या बारा वर्षापूर्वी शहरासह तालूक्यात ग्राहकांची फसवणूकीची अनेक प्रकरण होत होती. मात्र याबाबत तक्रारीला जागा नव्हती. ग्राहक पंचायतीची शाखा गावात व्हावी हा विचार डोक्यात असतांना पंचायतीचे धुरंधर बाबासाहेब कुलकर्णी, अॅड.जे.टी.देसले, डॉ.योगेश सुर्यवंशी, रतनचंद्र शाह यांच्या पुढाकाराने शाखा सुरू करण्यात यश मिळाले. प्रारंभी अनेक अडचणी आल्यात. त्यात मुख्य अडचण निधीची होती. परंतू दानशूर नागरीकांच्या सहकार्याने या अडचणीवर मात केली. गावोगावी जावून व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आज बारा वर्षाच्या अथक परीश्रमानंतर ग्राहक प्रश्न घेवून आमच्याकडे येतात हीच आमच्या कामाची पावती आहे.
– विजया वाघ, माजी तालुका संघटक
गेल्या सात वर्षात ग्राहकांचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या कार्याने प्रेरणा घेवून काम करू लागलो.तालूक्यामध्ये ग्राहक पंचायतीची पाळेमुळे खोलवर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्राहक पंचायतीचा विचार पोहचविण्यासाठी निबंध स्पर्धा, प्रशासन, महाविद्यालय आणि शालेय स्तरावर व्याख्याने आयोजीत केली. याशिवाय शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी यांच्या समस्या पंचायतीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यासाठी वरीष्ठांचे व सहका-यांचे सहकार्य मिळाले. शिक्षक म्हणून ओळख आहेच परंतू ग्राहक पंचायतीचे डागा सर हि नवी ओळख मिळाली. केलेल्या कामाची दखल वरीष्ठांनी देखील घेतली व पाठिवर वेळोवेळी कौतुकाची थाप दिल्याने काम करण्यास अधिकच प्रेरणा मिळाली.
– प्रा.चंद्रकांत डागा, तालूका संघटक
न्यायालयात ग्राहकांच्या फसवणूकीचे अनेक गुन्हे येतात. या फसवणूक झालेल्या व्यक्तिला न्याय मिळवून देण्यासाठीच काम करीत आहे. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून एक चांगले सामाजिक काम होत असल्याचे समाधान आहे. पतसंस्थेकडून होणारी तसेच शेतक-यांच्या फसवणूकीचे प्रमाण वाढले असून या बाबत पंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.
– अॅड. वसंत भामरे
आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरीक आहेत. देशाच्या विकासात याच विद्यार्थ्यांचा भविष्यात अधिक योगदान राहणार आहे. त्यामूळे ग्राहकांची कर्तव्य व अधिकार या विषयी माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. हे काम अधिक क्षमतेने होण्यासाठी ग्राहक पंचायतीचे व्यासपीठ मिळाले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.
– एम.ए.देसले, निवृत्त शिक्षक