शिंदखेड्यात एटीएम वारंवार बंद असल्याने नागरिक त्रस्त

0

शिंदखेडा । शिंदखेडा शहरातील जवळपास सर्वच एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तासनतास बँकेत रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमध्ये अनेक वेळा नोटाच नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. याबाबत बँकेत मॅनेजरला विचारले असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांचे हाल : शहरात स्टेट बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा दोन राष्ट्रीयकृत बँका आहेत. स्टेट बँकेत दोन तर सेंट्रल बँकेत एक एटीएम मशीन आहे. याशिवाय हस्ती व आयसीआयसीय बँकेत प्रत्येकी एक-एक एटीएम मशीन आहे. स्टेट बँकेत कर्मचा-यांच्या प्रमाणात खातेधारकांची संख्या अधिक आहे. पैसे काढणारे खातेदार व सर्व प्रकारचा भरणा करणा-या ग्राहकांची गर्दी असते. एटीएम मशीन बंद असल्यास या गर्दीत अधिकची भर पडते. अशा वेळी बँकेत उभे राहायला देखील जागा नसते. वृध्द लोकांचे अधिकच हाल होतात.

सहा दिवसांपैकी चार दिवस बंद : स्टेट बँकेत दोन एटीएम मशीनपैकी एका मशिन मध्ये पैसे काढता येतात तर दुस-या मशिन मध्ये पैसे टाकणे व काढणे असे दोन्ही व्यवहार होतात. परंतू दोन्ही मशीन आठवडयाच्या सहा दिवसांपैकी चार दिवस बंदच असतात. आणि मशिन सुरू असले तर कॅश नसते. तसेच बँकेत पासबुक प्रिंट करायचे मशिन देखील आहे. हे मशिन सुध्दा एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून बंद आहे. बँकेतील गर्दीत पासबुक भरणा-या आणि बॅलन्स विचारणा-या ग्राहकांची भर पडते. सेंट्रल बँकेचे एटीएम मशीन ईमारतीच्या खाली काकाजी कॉप्लेक्स मध्ये आहे. हे मशीन देखील अनेक वेळेस बंदच असलेले आढळून येते.

फक्त दोन हजारांच्याच नोटा
बंद असलेली एटीएम मशिन्स का बंद आहेत? या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. तसेच तात्काळ मशीन सुरू करण्याबाबत संबंधीत बँक मॅनेजर कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. बँक मॅनेजर आपल्या एसी कॅबीनमध्ये बसून फक्त उंटावरून शेळ्या हाकण्याचेच काम करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. बँक मॅनेजरांच्या या भूमिकेचा त्रास मात्र खातेदारांनाच सहन करावा लागत आहे. याशिवाय हस्ती व आयसीआयसी बँकेत असलेली एटीएम मशिन्स देखील अनेक वेळा बंद असतात. नोटा बंदीमुळे निर्माण झालेली परीस्थिती पूर्वपदावर आलेली असतांना देखील राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम मशीन मधून फक्त दोन हजाराच्याच नोटा निघतात. दोन हजारापेक्षा कमी रक्कम पाहिजे असणा-या ग्राहकांना नाईलाजाने दोन हजार रूपये काढावे लागतात अन्यथा रिकाम्या हाताने परत जावे लागते. बंद असलेली एटीएम मशिन्स तात्काळ सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.