शिंदखेड्यात कृषी अधिकारी कार्यालय वार्‍यावर!

0

शिंदखेडा । तालुका कृषी अधिकारी कार्यालय खरीप हंगाम सुरु असल्यामुळे तालुकाभरातील शेतकरी विविध कामांसाठी येत आहेत. मात्र त्यांना संबंधीत अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनातर्फे कृषी विषयक विविध योजना जाहीर होत आहेत. योजनांसाठी शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते, मात्र तालुकाभरातील बळीराजा जेव्हा आपली मशागतीचे कामे सोडून या कार्यालयात येतो तेव्हा त्याला आवश्यक असणारी माहिती दिली जात नाही.

अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे भ्रमणध्वनीही ‘नॉट रिचेबल’
या तालुक्याच्या कार्यालयात शेतीच्या कामांसाठी अभ्यागतांची नोंदवहीदेखील उपलब्ध करुन दिली जात नाही. तसेच कार्यालयीन कर्मचार्‍यांकडे कोणते काम होईल याची नाव आणि कामसुचीदेखील लावण्यात आलेली नाही. शेतकरी कार्यालयात आल्यावर या कर्मचार्‍यांच्या टेबलाभोवती चार-पाच खुर्च्यांवर कर्मचारी बसून गप्पा मारत बसलेले आढळतात. शेतकर्‍यांना बसण्यासाठी खुर्ची तर दूर साधी विचारपुसही केली जात नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांचे भ्रमणध्वनीही उपलब्ध करुन दिले जात नाही. याबाबत व्यापक जनआंदोलन उभारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.