छाप्यात 15 हजारांची गावठी व देशी दारू जप्त ; लोकप्रतिनिधीवरील कारवाईने खळबळ
भुसावळ- तालुक्यातील शिंदी येथे उपसरपंच अवैधरीत्या दारूची विक्री करीत असल्याची तक्रार रणरागिणींनी सोमवारी डीवायएसपी गजानन राठोड यांच्याकडे मोर्चा काढून केल्यानंतर पोलिस प्रशासन खळबडून जागे झाले. अवैध धंद्यांमुळे संसारांची राखरांगोळी होत असून गावाची शांतते भंग पावत असल्याने तातडीने अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी सुनीता पाटील, रोहिणी पाटील, नंदा पाटील, सुनंदा पाटील, लता मोरे यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळाने केल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी माघारी परतले.
पोलिसांच्या छाप्यात उपसरपंच अडकला जाळ्यात
महिलांच्या शिष्टमंडळाने केलेल्या निवेदनानुसार तालुका पोलिसांनी शिंदीत धाड टाकूनप बोदवड रस्त्यावरील रहिवासी तथा ग्रामपंचायत उपसरपंच सिद्धार्थ भीमराव तायडे यांच्या घरातून देशी-विदेशी दारूच्या 31 बाटल्या, 30 लिटर गावठी दारू व बाटल्या ठेवण्यासाठी लागणार्या फ्रीजसह 14 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी उपसरपंचास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, दिलीप पाटील व सहकार्यांनी केली.