शिंदे खून प्रकरणात भावाला अटक

0

चाकण: खेड तालुक्यातील शिंदे येथे जून महिन्यात प्रात:विधीसाठी गेलेल्या सतरा वर्षीय युवतीचा तीक्ष्ण हत्यारांनी मानेवर व चेहर्‍यावर वार करून खून केल्या प्रकरणी तिच्याच भावाला पोलिसांनी गजाआड केले आहे. आपणच बहिणीच्या आक्षेपार्ह वागण्यामुळे खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. हिंदी चित्रपट दृश्यम स्टाईलने भावाने खून करून संपूर्ण तपास प्रक्रियेत नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला होता. खून केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ठिकठिकाणी फिरून आपण खुनाच्या वेळी संबंधित ठिकाणी नव्हतोच असा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता.

लखन बालाजी वाघमारे (22, रा. शिंदे, मूळ. लातूर) याला बहिणीच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिंदे येथे 25 जूनला दुपारी बाराचे सुमारास प्रात:विधीसाठी गेलेल्या शीतल बालाजी वाघमारे (वय 17) या युवतीचा तीक्ष्ण हत्यारांनी मानेवर व चेहर्‍यावर वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या युवतीच्या भावास बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे.