शिंदे-बागुल वाद पुन्हा उफळला!

0

पुणे । महापालिका काँग्रेस पक्षातील गटनेते अरविंद शिंदे आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची सत्ता असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष होता. बागुल उपमहापौर असतानाही शिंदे गटनेते होते आणि त्यांच्यात अजिबात संवाद नव्हता. आता पालिकेत सत्ताबदल झाला, पण काँग्रेसचे गटनेते पद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ज्येष्ठत्वाच्या आधारे बागुल यांनीही गटनेतेपदासाठी दावा केला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस पक्ष एकसंध नाही, असे पुन्हा दिसून आले आहे.

शिंदेंच्या तक्रारी चव्हाणांकडे!
अलीकडेच बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी केल्या आहेत. शिवाय, महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी शिंदे यांच्यावर ढकलली आहे. गेली काही वर्षे व्यक्तीद्वेषातून बागुल यांच्याकडून आरोप केला जातात, त्याकडे दुर्लक्ष करणे, प्रतिक्रिया न देणे चांगले असे मत शिंदे यांच्या गोटातून व्यक्त करण्यात आले. बागुल यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवले आहे; तेव्हा अध्यक्षांशी बोलू असेही सांगण्यात आले. पालकमंत्र्यांच्या विरोधात शिंदे यांनी फलकबाजी केली. तो विषय राजकीय वर्तुळात गाजत असतानाच, पक्षपातच शिंदे यांच्याविरोधात तक्रारी झाल्या या योगायोगाचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.