शिकलेली आई घरादाराला पुढे नेई!

0

नागपूर । शिकलेली आई घरादाराला पुढे नेई!, पुरे एक बाळ,जाईल सुखाने काळ… या घोषवाक्यांची प्रचिती नागपूर जिल्ह्यात रुजू लागली आहे. घरातील महिला शिक्षित आणि जागरूक असली तर कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो. नागपूर जिल्ह्यातील कुटुंब नियोजनाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. शहरी भागातील स्त्री-पुरुषांच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष कुटुंब नियोजनासाठी मॉडर्न पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे तथ्य राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

आधुनिक पद्धतीचा अवलंब
नागपूर जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची पद्धत आणि नसबंदीवर सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागात 78.9 टक्के महिलांनी कुटुंब नियोेजनासाठी सामान्य गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला . शहरात हे प्रमाण 64.7 टक्के इतके आहे. शहर आणि ग्रामीण भाग मिळून ही आकडेवारी 69.1 टक्के आहे. ग्रामीण भागातील 77.8 टक्के महिलांनी कुटुंब नियोजनासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब केला आहे. शहरात हे प्रमाण 67.9 टक्के इतके आहे. कुटुंब नियोजनासंदर्भातील शस्त्रक्रियेसंदर्भात ग्रामीण भागातील महिलांनी शहरातील महिलांना मागे टाकले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण 68.1 तर शहरात हे प्रमाण 45.5 टक्के इतके आहे.

भविष्याचे गांभीर्य
ग्रामीण भागात सुविधा जेमतेम असतात , आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याची तयारी ठेवावी लागत असल्याने ग्रामीण भागातील माता मुलांच्या भवितव्याबाबत जास्तच जागरुक व गंभीर असतात. त्यातून सर्वच बाबतीतील मर्यादांची जाणिव असल्याने या माता मुले कमी असली तरी त्यांचे भवितव्य उज्ज्वल असावे म्हणून दक्षतेने कुटूंबनियोजनाचा विचार करतात. कुटूंबात त्याच याबाबतीत पुढाकार घेऊन पती व वडील धशर्‍यांचे मनही वळवतात. शिक्षणाचे महत्व त्यांना व इतरांना समजावे म्हणूनही धडपडत असतात. हे कारणही या सर्वेक्षणात प्रकर्षाने पुढे आले.

कंडोमचा अधिक वापर : गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करण्याचे प्रमाण गत काही वर्षांत घटले आहे. यातही ग्रामीण भागातील महिला शहरी महिलांच्या तुलनेत जागरूक आहे. कुटुंब नियोजनासाठी ग्रामीण भागातील 1.9 टक्के तर शहरातील 1.2 टक्के महिला गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करीत आहे.कुटुंब नियोजनासंदर्भातील साधनांसाठी कंडोमचा वापर केला जातो. नागपूर जिल्ह्यात 13 टक्के पुरुष कुटुंब नियोजनासाठी कंडोमचा वापर करतात. कंडोमचा वापर अधिक व्हावा यासाठी जागृती केली जात आहे.

1.6 टक्के महिला 19 व्या वर्षी आई : 19 वर्षे आणि याखालील वयोगटात मुलींना गर्भधारणा होण्याचे प्रमाण नागपूर जिल्ह्यात 1.6 टक्के इतके आहे. शहरात हे प्रमाण 1.8 तर ग्रामीण भागात हे प्रमाण 1.3 टक्के इतके आहे. 18 वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकणार्‍या 7 टक्के महिला जिल्ह्यात दिसून आल्या. शहरात ही आकडेवारी 6.1 तर ग्रामीण 9.5 टक्के इतकी आहे. कुटुंब नियोेजनासंदर्भात महिला जितक्या जागृत आहेत तेवढे पुरुष जागृत नसल्याचे स्पष्ट होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील केवळ 0.1 टक्के पुरुषांनी कुटुंब नियोजनासाठी नसबंदी मार्ग अवलंबला आहे.

ग्रामीण महिलाच ‘सुशिक्षित’
ग्रामीण भागातील महिला शहरातील महिलांच्या तुलनेत अधिक ‘सुशिक्षित’ असल्याचे म्हणावे लागेल. कुटूंबाप्रतीची संवेदनशीलता शहरी महिलांमध्येही असते पण संसाधनांच्या शहरी भागातील मुबलकतेमुळे त्या काहीशा बिनधास्त राहतात. थोडा खर्च होईल परंतु आपले जीवनमान उंचावलेले राहावे या विचारातून त्या उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधतात त्यातून या मुद्द्यावरची सजगता त्यांना महत्वाची वाटत नसावी, असे म्हटले जाते. प्रकृतीच्या बाबतीतही त्या या बिनधास्तपणातूनच बर्‍याचदा निष्काळजीपणा करतात.