शिकार उंदराची, ’बोका मोकाट’ : योगेश बहल

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील लाच घेताना पकडलेला लेखा विभागातील कनिष्ठ लिपिक हा मुख्य लेखापालाचे ‘कलेक्शन’चे काम करत होता. एक कनिष्ठ लिपिक वरिष्ठांची स्वाक्षरी करण्यासाठी चार हजार रुपये घेऊच शकत नाही. याचे खरे सूत्रधार मुख्य लेखापाल राजेश लांडे आहेत. त्यामुळे उंदराची शिकार झाली असून, मोठा बोका मोकाट असल्याची जहरी टीका, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. तसेच लांडे यांना सत्ताधार्‍यांचे अभय असून त्यामुळेच ते सुसाट वसूली करत सुटले आहेत. आगामी काळात लेखाविभागात धाड पडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही, बहल यांनी सांगितले. बिलाच्या फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन धनादेश देण्यासाठी ठेकेदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना पालिकेतील लेखा विभागाचा कनिष्ठ लिपिक प्रकाश जयसिंग रोहकले (वय-39, रा. पिंपळे गुरव) याला शुक्रवारी सकाळी पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

राजेश लांडे यांना ‘राजाश्रय’
याबाबत पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, भाजपची पालिकेत सत्ता येताच मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी आर्थिक वर्ष संपल्याचे कारण पुढे करत 31 मार्च 2017 नंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली नव्हती. लांडे यांनी 159 कोटी रुपयांची बिले स्थायीसमोर आणून स्थायीला दोन टक्क्यांनी पठाणी वसुली करुन दिली आहे. लांडे स्थायी समितीला सल्ले देतात. कामे आणतात, त्यामुळे त्यांना ’राजाश्रय’ दिला जात आहे. लांडे यांनी पैसे वाचविल्याचे सांगत त्यांचा कौतुक सोहळा केला जात आहे.

200, 2000, 1000 रुपये दर
लेखा विभागातील कर्मचारी फाईल ‘इनवर्ड ’ केली की 200 रुपये, बिलाची तरतूद केल्यावर 2000 रुपये आणि एक लाखाच्या बिलाचे धनादेश काढण्यासाठी एक हजार रुपये घेतात. मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी हे ठरवून दिले आहे. लेखाविभागात दररोज हजारो फाईल येत आहेत. त्यामुळे लांडे दिवसाला किती पैसे घेऊन घरी जात असतील, असा सवालही बहल यांनी उपस्थित केला. तसेच स्वत: खूप स्वच्छ, धुतल्या तांदळासारखे असल्याचे दाखविण्याचा लांडे प्रयत्न करतात. लाच घेताना पकडलेल्या उंदराची चांगली ’मशागत’ करावी, म्हणजे तो बोक्याचे नाव सांगेल. भाजपच्या पारदर्शक कारभाराचा हा नमुना आहे, असेही बहल म्हणाले.

लांडेंना कर्मचारी संघांचा होता विरोध
लेखापाल राजेश लांडे यांना महापालिकेत रुजू करुन घेऊ नये यासाठी कर्मचारी महासंघाचा विरोध होता. त्यांच्या विरोधाचा ठराव देखील महासभेने केला होता. परंतु, सत्ताधार्‍यांनी लांडे यांना अभय देऊन रुजू करुन घेतले आहे. लेखापाल राजेश लांडे यांची कामकाज करण्याची पद्धत देखील वादग्रस्त आहे, असेही ते म्हणाले.