347 remains of hunted wild animals seized: Action in Jalgaon जळगाव : शहरातील भवानीपेठेतील रामनाद मुलचंद कोगटा या दुकानात वन विभागाने छापा टाकत आठ प्रकारच्या वन्य प्राण्यांची शिकार करीत विक्रीसाठी ठेवलेले 347 प्रकारचे अवशेषासह तीन आरोपींना अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. डॉ.अजय लक्ष्मीनारायण कोगटा (53, रा.जळगाव), चुनीलाल नंदलाल पवार (30, रा.खेडगाव तांडा, ता.एरंडोल) व लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय 54, रा. जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. इतरही एका ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती होती. वन्य प्राण्यांच्या अवशेषांची कोगटांच्या दुकानात विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने या दुकानावर छापा टाकला.
हे अवयव केले जप्त
राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3, समुद्रघोडा 2 या वन्यप्राण्यांचे अवशेष वन विभागाच्या पथकाने दुकानातून जप्त केले आहेत. या प्रजातींचा समावेश वन्यजीव कायदा 1972 मधील परिशिष्ठ 1 व 2 मध्ये असून या प्राण्यांच्या शिकारीसाठी सात वर्ष कारावासाची तरतूद आहे.