शिक्का चोरुन, बनावट स्वाक्षरी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणार्‍यांचे बिंग फुटले

0

चक्क केली अति.जिल्हा शल्य चिकित्सकांची बनावट स्वाक्षरी ; खाजगी सुरक्षारक्षकाचा प्रताप; रेल्वे अप्रेटीन्सच्या उमेदवारांना दिले जात होते प्रमाणपत्र

जळगाव : रेल्वे अप्रेन्टीस पात्रतेसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रावर परस्पर शिक्का मारुन त्यावर अतिरिक्त जिल्हा चिकित्सकांची बनावट स्वाक्षरी करुन प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यामुळे मंगळवारी उघड झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील खाजगी सुरक्षा रक्षकाने शिक्का चोरला व स्वाक्षरी करण्याचा प्रताप केला. कर्मचार्‍याने जाब विचारल्यावर दारुच्या नशेतील सुरक्षारक्षकाने त्याच्या कानशिलात लगावल्याने गोंधळ झाला होता. यानंतर जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करुन सुरक्षारक्षकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान सोमवारी कैद्याला दाखल करण्यासाठी पैशांच्या मागणीचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी घडलेल्या या प्रकाराने जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, रेल्वे अप्रेन्टीस सह इतर शासकीय सेवेत रुजु होण्यासाठी पात्र उमेदवारास निरोगी असल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. नियमानुसार जिल्हा शल्य चिकित्साकाच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र दिले जाते. ह्या प्रमाणपत्राच्या आधारावरच उमेदवारांची निवड करण्यात असल्याने त्याला फार महत्व आहे. त्यानुसार यावल परिसरातील गिरधर श्रीधर बोदडे, युसूफ कादर बागवान, आनंदा लक्ष्मण भोळे या तिघाना वैद्यकीय प्रमाणपत्र लागत होते. यासाठी त्यांनी सुरक्षा रक्षक समाधान सोनवणेची मदत घेतली.

असे फुटले बिंग
रेकार्ड किपर म्हणून रविंद्र कृष्णा बागुल म्हणून कर्मचारी कार्यरत आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्रावर शिक्का मारण्याचे काम असते. प्रकरण आल्यानंतर त्यावर सही झाल्यानंतर शिक्का मारण्यात येतो. बागुल यांच्या कार्यालयातून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांचा शिक्का गायब झाला होता. त्यांनी शोधला मात्र सापडला नाही. नेमके चार वाजता सुरक्षा रक्षक समाधान सोनवणे तिघांना सोबत घेवून त्यांचे प्रमाणपत्र घेवून आला. त्यावर आधीच शिक्का मारला होता व जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सकांची स्वाक्षरी होती. शिक्का गायब असल्याने बागुल यांना संशय आला, सोनवणे यानेच शिक्का चोरुन बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार उघड झाल्याने त्यांना सोनवणे सह एका उमेदवाराला पोलीस चौकीत आणले.

मुजोर सुरक्षा रक्षकाची रेकॉर्ड किपरला मारहाण
शिक्का कुठे आहे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सका बनावट सही कशी केली व का केली, याबाबत कर्मचारी बागुल त्याची चौकशी करत असता, सुरक्षारक्षक सोनवणे यांना बागुल यांच्या कानशिलात लगावली. दोघांमध्ये झटापट झाल्यावर इतर कर्मचारीही धावून आले. त्यांनीही दारुच्या नशेत असलेल्या सोनवणेला चांगलाच चोप दिला. यादरम्यान सोनवणे सोबत इतर दोघा तरुणांनी पळ काढला होता.

जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावल्यानंतर गोंधळ झाला. यानंतर पोलीस चौकीतील कर्मचार्‍याने जिल्हापेठ पोलिसांना फोनवरुन माहिती कळविली. गुन्हे शोध पथकातील अजितसिंग पाटील यांच्या कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. व सोनवणे यास ताब्यात घेतले. उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान यापूर्वी अशा प्रकारे शिक्का व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बनावट स्वाक्षरीव्दारे अनेक वैद्यकीय प्रमाणपत्रे दिली गेल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलीस चौकशीत गंभीर बाबी समोर येणार आहेत.