शिक्रापुरातील जिम गजबजल्या

0

शिक्रापूर (मंदार तकटेे) । वाढत्या शहरीकरणामुळे मानवाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाला आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच तरुणाईसह सर्वांचीच पावले जिमकडे वळू लागल्याने जिममधील गर्दी वाढू लागली आहे. सध्या स्पर्धेच्या युगात धावपळ आणि ताणतणाव वाढत चालला असला तरी आरोग्याकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. आजची पिढी व महिलावर्ग फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. आरोग्य संवर्धनासाठी महिला जिमकडे वळल्या आहेत. त्यात शिक्रापूरवासीयही मागे नाहीत. येथील जिमही आता गजबजू लागल्या आहेत.

जिम हे आधुनिक व्यायामाचे ठिकाण बनले आहे. जिम आणि हेल्थ क्लबची संख्या शहरात वाढत चाललेली दिसत आहे. जिमचा दर्जा तेथील अत्याधुनिक साधनांवर ठरलेला आहे. त्यानुसार त्यांचे शुल्क अवलंबून आहे. त्यामुळे तीनशे रुपयांपासून ते दीड हजारांपर्यंत महिन्याचे शुल्क आकारण्यात येते. हेल्थ क्लबचे शुल्क तेथील सुविधांप्रमाणे असते.

आधुनिक उपकरणांचा वापर
फॅशनच्या दुनियेत स्लीम दिसण्याची क्रेझ महिला व मुलींमध्ये दिसून येत आहे. थोडेदेखील जाड झाले तरी मुली लगेच डायट अथवा जिम सुरू करतात. अशा गोष्टी शक्यतो फिटनेस ट्रेनर अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे योग्य ठरते. जिममध्ये व्यायामासाठी विविध आधुनिक उपकरणांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कार्डिओ मशीन, पॉवर लिफ्टिंग, ब्डॉमिनल मशीन, लिव्हरेज, इंक्लाईन प्रेस, बारजॉगर, बुलवर्कर, डंबल, स्टनिंग सायकल आदी साधनांचा समावेश आहे. वेटलॉस, वेटगन, बॉडीबिल्डिंग, जनरल फिटनेस, स्टीम बाथ अशी व्यायामाची वर्गवारी आहे.

रोजगार, करिअरच्या वाटा
नागरिक फिटनेसवर लक्ष केंद्रित करू लागल्यामुळे जिमला जाणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. या क्षेत्रात आवड असलेल्यांना जिममध्ये ट्रेनर, जिम इन्स्ट्रक्टर होण्याची चांगली संधी आहे. काही तरुण या क्षेत्राकडे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून वळत आहेत. स्टार हॉटेल्स, क्रूझ, स्थानिक जिम्ससोबतच परदेशातसुद्धा काम करण्याची संधी आहे. व्यायाम करणार्‍यांवर लक्ष ठेवणे व मदत करण्यासाठी पर्सनल ट्रेनरची गरज पडते.

नोकरदार महिलांचा अधिक कल
आजकाल 60 टक्के महिला या नोकरदार आहेत. नोकरी करीत आसताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी महिलांचा जिमकडे कल वाढला आहे. जिममुळे महिलांचा लठ्ठपणा, पाठ, मानेचा त्रास आदींपासून मुक्ती मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिममध्ये महिलांचे प्रमाण वाढले आहे. नोकरी करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिमच्या माध्यामातून फिटनेस कायम राखण्यावर महिलांचा कल वाढला आहे. हिवाळ्यात बॉडी बनविण्यासाठी तरुणांचे जिममध्ये प्रमाण वाढत आहे, असे शिक्रापूरातील फिटनेस ट्रेनर स्वप्नील करंजे यांनी सांगितले.