शिक्रापूर । बेशिस्त वाहनचालक, रोडरोमिओंविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गुरुवारपासून सुरुवात केली आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे.शिक्रापूर येथील चाकण चौक व पाबळ चौकात नेहमीच बेशिस्त वाहन चालक, बेशिस्त पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अशा वाहनांवर व चालकांवर कारवाई करण्याची मोहीम शिक्रापूर पोलिसांनी हाती घेतली आहे. शिक्रापुरातील चौकांमध्ये व शाळा महाविद्यालये या ठिकाणी दररोज अशा पद्धतीची कारवाई करणार असल्याची माहिती गिरीगोसावी यांनी दिली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरणार्या वाहनांवर कारवाई करून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचे काम पोलिस कर्मचारी करताना दिसत आहेत.
या मोहिमेंतर्गत बेशिस्त वाहनांबरोबरच विना परवाना वाहन चालविणे, ट्रिपल सिट, बिगर नंबर, शाळा व महाविद्यालये या ठिकाणी गिरक्या मारत असणार्या तसेच काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवरदेखील कारवाई करण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, हवालदार दत्तात्रय होले, संदीप जगदाळे, दत्तात्रय शिंदे, आप्पासाहेब सूर्यवंशी, संजय ढमाल, ज्ञानेश्वर शेवरे, निखील रणदिवे, तुषार खेंगरे, महिला पोलीस जे. आय. वाल्मिकी, होमगार्ड आकाश कोठावळे, दिनेश गायकवाड, अमोल राऊत, किरण थोरात, यांनी दिवसभरात 50 हून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यापुढे देखील अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवशांत खोसे यांनी दै. जनशक्तिशी बोलताना सांगितले. पोलिसांनी हाती घेतलेल्या या कारवाईच्या मोहिमेचा वाहनचालकांनी देखील चांगलाच धसका घेतला आहे. तर ग्रामस्थांमधून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भिमा, तळेगाव ढमढेरे आदी परिसरामध्ये दररोज अशा पद्धतीच्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वाहन चालकांना शिस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कारवाई सुरूच ठेवणार
शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहतूक, बेशिस्त वाहन चालक, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच शाळा व महाविद्यालयीन मुलामुलींना त्याचा त्रास होत असतो. सध्या सुरू असलेली कारवाई यापुढे देखील अशीच सुरू ठेवणार असून या वाहनचालकांवर कारवाई करणार असल्याचे यावेळी पोलिस उपनिरीक्षक शिवशांत खोसे यांनी सांगितले.