गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
शिक्रापूर । शिक्रापूर येथील हमिराणी मेटल कंपनीत 10 ते 15 दरोडेखोरांनी 15 फेब्रुवारीला दरोडा टाकून 23 लाख 19 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. यातील चौघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. दिपक पानसरे (वय 34), वामन पानसरे (वय 48), सतीश साबळे (वय 35), पवन वाडेकर (वय 30) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत.
बजरंगवाडी येथील हमीराणी मेटल या तांब्याच्या धातूचे जॉब बनविणाच्या कंपनीत 10 ते 15 अनोळखी चोरट्यांनी कंपनीच्या सुरक्षारक्षकास हाताने मारहाण करून पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवून 23 लाख 19 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या रॉडपट्टी, सिंगल तारा, तांब्याच्या पट्टीने भरून ठेवलेल्या 190 बॅग असा 7600 किलो वजनाचा माल जबरीने चोरून नेला होता. त्याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
13 लाखाचा माल जप्त
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षिरसागर यांचे पथक तपास करत होते. हे आरोपी असेंट कारमधून बहुळला येणार असल्याची माहीती एका खबर्यामार्फत गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यावरून सदर पथकाने साध्या वेशात सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून कार, गुन्ह्यात वापरले साहित्य व 13 लाख 92 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
27 पर्यंत पोलिस कोठडी
या आरोपींना पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर व पोपट गायकवाड यांनी सांगितले. या आरोपींना शनिवारी शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे हे करत आहेत.