सणसवाडी । शिक्रापूर ते पाबळ या 18 कि.मी. रस्त्या गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ठीक-ठिकाणी उखडला गेला होता. डांबर उघडे पडून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. शिक्रापुर ते पाबळ रस्ता आंबेगाव व शिरूर मतदारसंघाला जोडला असल्याने या रस्त्यावर शेतीमालाची वाहतूक, कामगार वर्ग व विद्यार्थीवर्ग तसेच दोन्ही गावे बाजारपेठेची असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.
10 वर्षांपासून हा रस्ता सतत नादुरुस्त झाल्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. त्यामुळे रस्ता समतल पातळीत नाही. शिवाय साईडपट्ट्या शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे मालवाहतूक व मोठ्या चारचाकी वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. समतल पातळी न राहिल्याने धक्के बसत आहेत. रस्ता पूर्णपणे समतल पद्धतीने डांबरी करावा व साईडपट्ट्या भराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.