शिक्रापूर/सणसवाडी : वढू बुद्रूक येथील दोन दिवसांपूर्वी घडलेली नामफलकाच्या विटंबणेची घटना शांत होत नाही तोच, विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाणार्या वाहनांवर तसेच शासकीय व स्थानिक वाहनांवर पुणे नगर महामार्ग, शिक्रापूर-चाकण महामार्गावर सोमवारी ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली. रविवारी वढू येथे झालेल्या बैठकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी वाद मिटवला होता; परंतु सोमवारी सकाळपासून पुन्हा वाद चिघळला. काही समाजकंटकांनी दगडफेक करत वातावरण तणावपूर्ण केले. तसेच, वाहनांची जाळपोळही करण्यात आली. जिल्हा पोलिसांनी तातडीने सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने दंगलसदृश परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्य राखीव पोलिस दलही तैनात करण्यात आले. कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाचा कार्यक्रम तणावपूर्ण; परंतु शांततेत पार पडला.
अपुर्या पोलिस बलामुळे जमावाचे फावले
सोमवारी सकाळी वढू गावामध्ये दोन्ही समाजाच्या लोकांची गर्दी झालेली होती. त्यातच कोरेगाव भीमा येथे अज्ञातांनी काही गाड्यांवर दगडफेक व जाळपोळ सुरु केली. यामध्ये जवळपास 7 ते10 दुचाकी व चारचाकी पेटविण्यात आल्यात. जाळपोळीचे हे लोण पुढे सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी या ठिकाणीही पसरले. सणसवाडीमध्ये दुकानांना काही ठिकाणी आगी लावण्यात आल्या. तसेच वाहनांचीही नासधूस करण्यात आली. शिक्रापूर येथील व्यापार्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली होती. पोलिस प्रशासन दगडफेक व जाळपोळ थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण जमाव जास्त असल्याने पोलिसबळ त्याठिकाणी अपुरे पडत होते.
परिस्थिती पूर्वपदावर
राज्य राखीव दलाच्या तुकड्या दाखल झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली आहे. आग विझवण्यासाठी आलेल्या आगीच्या गाड्यासुद्धा या जमावाने फोडून शासकीय वाहनांचे नुकसान केले होते. त्यामुळे शिक्रापूर पोलिस ठाणे येथे अज्ञात इसमांविरुद्ध शासकीय तसेच इतर वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.