प्राचार्य डॉ. सुधाकर साळी यांचे प्रतिपादन
वडगाव मावळ : तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकांचे स्थान कायम टिकून आहे. आई-वडील विद्यार्थ्याला जन्म देतात, तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात. विद्यार्थ्यांवर आदर्श संस्कार करण्याची जबाबदारी ही आई-वडील व शिक्षकांची आहे. शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यायवत ठेवणे काळाची गरज आहे. संघर्षातूनच खरा कार्यक्षम विद्यार्थी घडतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुधाकर साळी यांनी केले. येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य महाविद्यालयात शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुधाकर साळी, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. शीतल दुर्गाडे, प्रा. भाऊ लावंड, प्रा. शीतल शिंदे, प्रा. विनोद भुजबळ, प्रा. गजानन वढुरकर, प्रा. सुधीर ढोरे, प्रा. रोहिणी चंदनशिवे, प्रा. योगेश जाधव, प्रा. अतुल जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
संकटांचा धैर्याने सामना करावा
डॉ. सुधाकर साळी पुढे म्हणाले की, विद्यार्थी-शिक्षक हे नाते अनादी काळापासून सुरू असून, विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाट हा आई-वडील व शिक्षकांचा असतो. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी संकटांचा धैर्याने सामना करावा, असे आवाहन डॉ. साळी यांनी केले. प्रा. महादेव वाघमारे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रथम गुरू आई-वडील व शिक्षक असून, तेच खरे मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या यशात सिंहाचा वाट हा आई-वडील व शिक्षकांचा असतो. विद्यार्थी दशेत नम्रता हा दागिना आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन देशसेवा करावी, असे आवाहन यावेळी प्रा. वाघमारे यांनी केले.
संयोजनात यांचा हातभार
या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमधून धनंजय शिंदे, स्वाती धनवे, वैभव लष्करी, नेहा गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड, माधुरी शिंदे, रुपेशकुमार मुळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन दामिनी वाघवले यांनी केले. विशाल कडू यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.