शिक्षकदिनी गुणवंतांचा सन्मान!

0

नवी मुंबई । महानगरपालिकेच्या शाळेत वंचित घटकातील मुले शिकण्यासाठी येतात, त्यातील अनेकांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्वही ठाऊक नसते. अशा मुलांना घडवण्याचे व त्यातून गुणवत्ता वाढीचे मोठे काम नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक करीत असून त्यांचे विशेष कौतुक आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी नवी पिढी घडविणारे शिक्षक जिवंत माणुसकीचा प्रत्यय देतात अशी भावना व्यक्त केली. ते विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या शिक्षक दिन समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते.

माणसाला घडवणारा एकच पेशा तो म्हणजे शिक्षक
यावेळी शिक्षकांसाठी नामवंत व्याख्याते वसंत हंकारे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत दिलखुलास शैलीत दैनंदिन दाखले देत त्यांनी प्रयोगशील शिक्षणाच्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रबोधन केले. गर्वसे कहो हम शिक्षक है हा आत्मविश्‍वास आपल्यात रुजायला हवा. कारण माणसाला घडविणारा एकच पेशा आहे आणि तो म्हणजे शिक्षक असे सांगत त्यांनी जो मुलाला जाणतो तोच खरा ज्ञानरचनावाद अशी साधी सोपी व्याख्या सांगितली. आपण शिक्षकच का झालो? याची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्यामुळे एक शिक्षक चुकला तर पिढी बरबाद होते ही जबाबदारी ओळखून आपल्या पेशाचा अभिमान बाळगा असे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे नमूद करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळांची पटसंख्या वाढते आहे याबद्दल अभिमान व्यक्त करून याचे श्रेय सर्व शिक्षकांचे असल्याचे अधोरेखीत केले. यापुढील काळात अधिक दर्जेदार काम करावयाचे असून 100 टक्के निकाल हे आपले ध्येय असले पाहिजे व आपण ते पूर्ण करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.