शिक्षकांचे विद्यार्थी प्रेम ; वर्गाबाहेर दिले विद्यार्थ्यांना धडे
रावेर- तालुक्यातील कर्जोद येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत आरटीईच्या मानकानुसार शिक्षक नसल्याने आणि वारंवार मागणी करूनही शिक्षक दिले जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास वर्ग सुरू असताना शाळा बंद करून कुलूप ठोकले. रीक्त जागांवरील शिक्षक हजर केले जात नाहीत, तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली. आरटीईच्या मानकानुसार 134 विद्यार्थी संख्येनुसार येथे किमान पाच शिक्षकांची गरज आहे परंतु येथे कायमस्वरूपी केवळ दोन शिक्षक आहे. एक शिक्षक प्रतिनियुक्तीवरील आहे.
शिक्षिकेबाबत ग्रामस्थांची तक्रार
या शाळेत सीनियर शिक्षिका अंजुम फारूखी या नेहमीच रजेवर असल्याने व मंगळवारीदेखील त्या रजा न टाकताच सुटीवर गेल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. सोयी-सुविधेबरोबर शाळेला नवीन इमारत असावी तसेच शिक्षकांची रीक्त पदे व अन्य सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.
कुलूपानंतर अधिकार्यांची धावपळ
शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावल्याचे समजताच रावेरहून शिक्षण विस्तार अधिकारी नईमोद्दीन, केंद्रप्रमुख कलीम, सय्यद इकबाल, नाजीर अली सर यांनी शाळेला भेट देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु पालकांनी गटशिक्षणाधिकार्यांना बोलावण्याची मागणी केली. दुपारी चार वाजता गटशिक्षणधिकारी विजय पवार आल्यानंतर त्यांनी समस्या ऐकून घेतली. शिक्षिका अंजुम फारूखी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले मात्र ग्रामस्थांनी त्यांच्या बदलीची मागणी केली. गटशिक्षणाधिकार्यांनी दोन शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर देण्याचे आश्वासन प्रसंगी दिले. ऐनपूर व रसलपूर शाळेत शिक्षक देण्याचे तसेच रीक्त जागा लवकर भरण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले. यावेळी शरीफ शेख, पत्रकार शकील शेख, आरीफ शेख, आसीफ मेम्बर, अकील शेख, अल्ताफ शेख, बिस्मिल्ला शेख, आरिफ शेख, शकील खान, कलीम शेख, अकिल मिस्त्री, साजीद शेख व असंख्य पालक उपस्थित होते