मुंबई । राज्यातील अनुदानास पात्र झालेल्या शाळांना सरकार अनुदान देत नाही. अनेक आंदोलने करूनही काही फरक पडत नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी आता शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बरोबर मोबाईलवर ’मेसेज वॉर’ आंदोलन सुरू केले आहे. हजारो शिक्षक आम्हाला आमच्या हक्काचे 100% अनुदान द्या व आम्हाला सेवेत कायम करा, असे मेसेज टाकत आहेत. मुंबईत मुंबई विनाअनुदानीत शाळा कृती समिती, स्वाभिमान शिक्षक संघटना आदींनीही शिक्षण मंत्र्याच्या विरोधात मेसेज वॉरची मोहीम सुरू केली असल्याची माहिती संघटनेच्या प्रतिनिधिकडून देण्यात आली.
शाळांना केवळ 20 टक्के अनुदानच
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विविध शिक्षक संघटनांनी याच अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र या आंदोलनाला शिक्षण विभागाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप मुंबईतील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रशांत रेडीज यांनी केला. शिक्षण विभाग जागे होत नाही, यासाठीच आम्ही शिक्षण विभागाविरोधात आता राज्यभरातील शिक्षकांकडून डिजीटल पद्धतीने मेसेज वॉर सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील 1628 शाळा व 2452 वर्गतुकड्या यांचा 100 टक्क्यांचा हक्क असूनही या शाळांना निधी कमतरतेच्या नावाखाली केवळ 20 टक्के अनुदानच देण्यात आले आहे.