मुंबई : जिल्हापरिषद शिक्षकांना शहरांमध्ये सेवा करणे लवकरच शक्य होईल. राज्य सरकार यासंदर्भातील एक महत्वपूर्ण धोरण निश्चित करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात दिली.
अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांना नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षकी सेवा करता येत नसे. अशा सेवा वर्ग करण्यासाठी जिल्हा परिषदेमधून महानगरातील शाळांमध्ये बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांकडून त्यांच्या सेवा वर्ग करण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीचा विचार करत या शिक्षकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बदलीसंदर्भात नव्याने धोरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
यामध्ये राज्य शासनाच्या किंवा त्यावेळी अंमलात प्रस्थापित झालेल्या कोणत्याही महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपरिषदेच्या नियमित आस्थापनेवर सेवा वर्ग करण्यासाठी अर्ज करता येईल. यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या नियमित शिक्षकाने विहित मार्गाने विनंती अर्ज करायचा आहे. यावर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा अर्जदार कर्मचाऱ्यांना नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांच्यामध्ये सामाविष्ट करण्यास परस्पर सहमत होतील, अशा अटी व शर्तीवर कार्यमुक्त करून बदली करण्यात येईल असेही मुंडे यांनी सांगितले.