चिंबळीः शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांनीही मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बर्गे यांनी केले. बर्गेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने नव्याने रूजू झालेल्या नविन शिक्षकांचा व बदलून गेलेल्या शिक्षकांचा गौरव सभारंभ नुकताच पार पडला. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी सुशिला बर्गे व शाळा समितीच्या अध्यक्षा सारिका बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब बर्गे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोठे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांना गुरूचा मान दिला जातो. शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केले असता, विद्यार्थी उत्तम घडतील. विद्यार्थ्यांना आता पासूनच पुढे जाताना कधी मागे पडण्याची, कधी नाही म्हणण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे त्यांना किरकोळ गोष्टींसाठी आत्महत्या करावी वाटणार नाही. बर्गेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बदलून गेलेल्या वर्ग शिक्षिका स्वाती गावडे, वर्षा ढोरे व विभावती दंडवते आणि नव्याने रूजू झालेले वर्गशिक्षक प्रकाश गोळवे, सुनिता निक्रड, वृक्षाली पवार यांचा शाळा समितीच्यावतीने शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बर्गे, माजी उपसंरपच विश्वास बर्गे आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या चेतना बर्गे, बाळासाहेब बटवाल, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.