चोपडा येथील कार्यक्रमात अॅड.व्ही.डी.जोशी यांचे प्रतिपादन
चोपडा । शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होत आहेत, शिक्षणातील छडी गेली, शिक्षा करणे रद्द झाल्याने नियंत्रण आणि शिस्तीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी आदरयुक्त भीती निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षकांचा धाक विद्यार्थ्यांना असलाच पाहिजे. प्रत्यक्ष अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढेल, उत्सुकता वाढेल, रुची वाढेल. यासाठी प्रयत्न करुन तयारी करावी. शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी नाते कसे आहे. यावर शिक्षेचे स्वरुप अवलंबून आहे, असे प्रतिपादन अॅड.व्ही.डी.जोशी यांनी केले. भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्यावतीने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी आयोजित ‘कॉफी विथ बीएमसी’ या उद्बोधन व्याख्यानमालेचे ’शिक्षण व कायदा’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले, शिक्षकाशिवाय शिक्षण नाही तसेच कायद्याशिवाय समाज नाही. शिक्षणातुन माणूस सुसंस्कृत बनतो तसाच कायद्याने समाज सुधारतो. शिक्षक हे शिक्षण क्षेत्रातील सेवेकरी असून समाजातील सर्वांत श्रेष्ठ घटक आहे. कायद्याचे शिक्षण हे जीवनाचे-शिस्तीचे शिक्षण आहे. कायद्याचे शिक्षण सर्वांना दिले गेले पाहिजे. कारण कायद्याविषयीचे अज्ञान हाच मुळात गुन्हा आहे. कायदा जीवनात अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी यांनी अॅड.व्ही.डी.जोशी यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंचावर वसंतभाई गुजराथी, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले. वर्षभर अशा विविध विषयांवरील मार्गदर्शक व्याख्यानांचे आयोजन या उद्बोधन व्याख्यानमालेत केले जाणार आहे. याप्रसंगी संस्थेच्या विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रश्नोत्तरानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.