शिक्षकांचा शासनाविरोधात एल्गार

0

नंदुरबार । महाराष्ट्र राज्य शासनाकडून वारंवार काढल्या जाणार्‍या जाचक परिपत्रकामुळे राज्यातील शिक्षक मेटाकुटीस आला असून या विरोधात संपूर्ण राज्यातील शिक्षक पेटून उठला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात शिक्षकांनी शासनाविरूध्द आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्याअंतर्गत आज संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील समविचारी शिक्षक संघटनाच्या पदाधिकार्‍यानी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज शासनाला निवेदन देण्यात आले.

शिक्षकांना न्याय द्या
शासनाने शिक्षक संवर्गातील कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या परिपत्रकांच्या माध्यमातून वेठीस धरले आहे. 2005 नंतर लागलेल्या कर्मचार्‍यांना जाचक अशी पेन्शन योजना, शाळा अ श्रेणीत असलेल्या शिक्षकांनाच निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी देणे, सर्व प्रकारची ऑनलाईन कामे शिक्षकांकडून करून घेणे, एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकाचे पगार रोखणे, अशा माध्यमातून शासन शिक्षकांचा छळ करत आहे. यातून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी समविचारी प्राथमिक शिक्षक संघटनांनी केली आहे.

अतिदुर्गम भागात पदस्थापना देवू नये
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जनरल बोर्डाने पारित केलेल्या ठरावाला स्थायी समितीने नामंजूर केले आहे. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील 104 गावे अवघड असूनही सोप्या क्षेत्रात आली. ती 104 गावे अवघड धरूनच बदली प्रक्रिया राबविण्यात यावी. महिला शिक्षकांना अतिदुर्गम भागात पदस्थापना देऊ नये, नंदुरबार जिल्हातील बदली प्रक्रिया समुपदेशनाने राबविण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. नंदुरबार जिल्हयातील विविध समविचारी प्राथ शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कापूरे, कार्याध्यक्ष किरण मोहिते, रतिलाल सामुद्रे, आखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, सरचिटणीस अशोक देसले, उपाध्यक्ष संजय खैरनार, पदविधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश आव्हाड, सरचिटणीस रामकृष्ण बागल, संघटक देवेंद्र बोरसे, आबा बच्छाव, गोकुळदास बेडसे, किरण पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील, राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, सरचिटणीस संजय बागुल, राज्य सहसचिव सतिष पाटील, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्‍वर मोरे, सचिव हेमकांत मोरे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राहुल पवार, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेडसे, एकल शिक्षक मंचचे रोहिदास पाटील, शिक्षक समितीचे एकनाथ कुवर, भरत भामरे, दौलत चव्हाण तसेच जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवाजेष्ठतेनुसार बदली करा
या राज्यस्तरावरील मागण्यांसोबत बदल्या करतांना 27 फेब्रु. 2017 च्या शासन निर्णयानुसार बदल्या कराव्यात, परंतू अवघड भागातील शिक्षकांना साधारण भागात आणतांना कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी त्यात दुरुस्त्या कराव्यात, अवघड भागात यापूर्वी सेवा केलेल्या शिक्षकांना पुन्हा अवघड भागात पाठवू नये, त्याआधी कधीही न गेलेल्या शिक्षकांना पाठविणे ते संपल्यानंतर सेवाजेष्ठतेने बदल्या करण्यात याव्यात.