शिक्षकांचा 12 रोजीपासून तीनदिवसीय संप

0

भुसावळ। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 12 ते 14 जुलै दरम्यान शिक्षकांनी तीनदिवसीय संप पुकारला आहे. 16 जानेवारी रोजी वर्षा बंगल्यावर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिल्याने संप स्थगित करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून आजपर्यंत सहा महिने उलटूनही कामकाज सुरु झालेले नाही. त्यामुळे 12 ते 14 जुलै दरम्यान संप करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करा
समन्वय समितीचा एक मुख्य घटक महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आहे. 25 जुन रोजी महाराष्ट्र हायस्कुल सदाशिव पेठ, पुणे येथे महामंडळ अध्यक्ष व माजी आमदार व्ही.यु. डायगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीचे सभा झाली. त्या सभेनुसार तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. केंद्र शासनाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू कराव्या, 1 जानेवारी 2017 पासूनचा वाढीव महागाई भत्ता विनाविलंब द्यावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचे अध्यक्ष व्ही.यु. डायगव्हाणे, कोषाध्यक्ष भारत घुले, सरचिटणीस व्ही.जी. पवार यांनी कळविले आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच अध्यक्ष एच.जी. इंगळे, सचिव एस.डी. भिरूड, उपाध्यक्ष आर.आर. पाटील, साधना लोखंडे, आर.एच. बाविस्कर, बी.डी. महाले, एस.एन. पाटील यांनी केले आहे.