शिक्षकांची जागा आता गुगलने घेतली

0

जळगाव । तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावात शिक्षकांची जागा गुगलने घेतली असून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुगलद्वारे मिळू शकतात यावर विद्यार्थ्यांचा विश्वास वाढल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद संपत चालला असल्याची खंत कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणकशास्त्र प्रशाळेच्या वतीने शिक्षण दिनानिमित्त शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात कुलगुरू बोलत होते. यावेळी प्रशाळेचे संचालक प्रा.बी.व्ही.पवार, प्रा.सतिष कोल्हे, प्रा.आर.जे.रामटेके हे मंचावर उपस्थित होते.

कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, गुगलद्वारे विद्यार्थ्यांना माहिती जरूर मिळेल परंतू ज्ञान मिळणार नाही. ज्ञान हे शिक्षकांकडूनच प्राप्त होते. आजकाल विद्यार्थ्यांना प्रश्न पडत नाहीत त्यामुळे ते शिक्षकांना प्रश्न विचारत नाहीत आणि शिक्षक देखील विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत म्हणून अपडेट राहत नाही अशी परिस्थिती आहे. केवळ पदवी घेण्यासाठी म्हणून विद्यापीठात येवू नका. पाठघपुस्तकाबाहेरचे शिक्षणही महत्वाचे आहे आणि ते शिक्षण संवेदनशिल शिक्षकच देवू शकतो असेही ते म्हणाले. आजकाल कोणता शिक्षक किती चांगल्या नोट्स देतो यावर शिक्षकाचे मूल्यमापन केले जाते मात्र शिक्षकाचे त्याविषयातील ज्ञान, शिकवण्याची हतोटी, शौली आणि शंकाचे समाधान करण्याची शिक्षकाची क्षमता यावर मूल्यमापन व्हायला हवे असेही ते म्हणाले.