जळगाव। सध्या खाजगी शाळांचे व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबाबत नागरिकांमध्ये आकर्षण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना आपले अस्तित्व टिकविणे अवघड बनले आहे. मात्र चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील रहिवासी आणि सध्या एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक किशोर रमेश पाटील यांनी जनजागृती, वृक्षारोपण, शैक्षणिक विकास अशा विविध कार्यासाठी पुढाकार घेत स्वत: च्या मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे.
अनेक शिक्षक आपल्या मुलांना आपल्या स्वत: च्या शाळेचा दर्जा ओळखून इतर खाजगी अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकताना दिसतात मात्र किशोर पाटील हे यास अपवाद ठरले आहे. गेल्या 16 वर्षापासून ते शिक्षक म्हणून आहे. तळई येथे त्यांचा मुलगा क्षितीज हा पहिली ते चौथी पर्यत शिकला. या शाळेत त्यांनी सेमी इंग्लिश मीडियमची सुरुवात केली आहे. राज्यात सर्वप्रथम हीच शाळा पहिली सेमी इंग्लिश ठरली. भिल्लवस्ती शाळेला आयएसओ करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. महाराष्ट्र या राज्याच्या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठीत झालेल्या टास्कफोर्सवरील समितीत क्रियाशील सदस्य म्हणून नुकतीच त्यांची निवड झाली आहे.