तळेगाव दाभाडे : शाळा सुरु असतानाच शाळेतच चिकन पार्टी करणार्या शिक्षकांचा ‘उपक्रम’ तळेगाव दाभाडे येथील एका नामवंत माध्यमिक शाळेत नुकताच पार पडला. स्नेहसंमेलनानंतर झालेला शिक्षकांचा हा ’श्रमपरिहार’ संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
स्नेहसंमेलन संपले की स्नेहसंमेलन प्रमुखांकडून पार्टी उकळण्याचा बेत ही शाळा नियमितपणे करत आली आहे. यावर्षी काही पुरुष शिक्षकांनी नॉनव्हेज पार्टीचा आग्रह धरला त्यामुळे प्रमुखाचा नाईलाज झाला. शेवटी त्या पार्टीत सगळेच सामील झाले व दहा ते चार या शाळेच्या वेळेतच शाळेच्या आवारात चिकन शिजविण्यात आले आणि 19 शिक्षकांनी त्यावर ताव मारला. मांसाहार न करणार्या उर्वरित 17 शिक्षकांना शाकाहारी मेजवानी देण्यात आली. या काळात शाळेचे वेळापत्रक यथातथाच पार पडले.
शाळेच्या वेळेत आणि आवारात चिकन शिजविल्याने सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये ही पार्टी चर्चेचा विषय बनली आहे. एकेकाळी नामवंत असलेली ही शाळा पूर्णतः बेशिस्त झाली असून टारगट मुलांचा शाळेत दररोज धुमाकूळ सुरु असतो. अर्थात त्याला मुख्याध्यापक व काही शिक्षक जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप आहे. या चिकन पार्टीची सखोल चौकशी करत या शाळेत दर बुधवारी शिक्षकांचा मोठा उपहार डे साजरा होतो, अशी माहिती पण पुढे आली आहे.