जळगाव: शिक्षकांना महिन्याच्या सुरुवातीस १ तारखेला वेतन मिळत नाही. यासाठी वारंवार आंदोलने करुन देखील वेतन अनियमितपणे दिले जात असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी मांडल्या असता शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षणाधिकार्यांना धारेवर धरीत १तारखेला वेतन न झाल्यास ५ तारखेला स्वत: शिक्षणाधिकार्यांकडे ठाण मांडून जाब विचारला जाईल. असा इशारा दिला.
शिक्षक आ.किशोर दराडे यांनी आज शिक्षक पतपेढीच्या सभागृहात शिक्षक दरबार घेतला. यात शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निरसन केले. याप्रसंगी शिक्षकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या यात प्रामुख्याने १ तारखेला वेतन करण्याची मागणी करण्यात आली. शिक्षकांनी काढलेले कर्जाचे हप्ते तसेच इतर गुंतवणुकीचे हप्ते भरण्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दरमहा १ तारखेला वेतन करण्यात यावे अशी मागणी शिक्षकांनी केली. यावर आ.किशोर दराडे यांनी याबाबत अधिकार्यांना जाब विचारत वेतन वेळेवर करण्याच्या सुचना दिल्या. तसेच १५ ते १६ वर्षांपासून विना अनुदानित शाळेत विनावेतन काम करणार्या शिक्षकांना वेतन अनुदान दिवाळीपुर्वी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.दराडे यांनी सांगितले.