लोणावळा । माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षक परिषद व मावळच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकार्यांची भेट घेतली. यावेळी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके व मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांच्याशी चर्चा केली.
पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने सर्व शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने काढावे, महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक शिक्षकाच्या खात्यावर वेतन जमा होतील असे आदेश काढले आहेत. परंतु पुणे जिल्हा परिषदेच्या काही कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक महिन्यांपासून नियमित होत नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन मावळ तालुक्यातील शिक्षक परिषदेच्या काही पदाधिकार्यांनी शिक्षणाधिकार्यांची भेट घेऊन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी केली. यावेळी शिक्षक परिषदेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष गुलाबराव गवळे, उपाध्यक्ष पांडुरंग ठाकर, कार्यवाह बबनराव उकिर्डे, मावळ तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब अगळमे, कार्यवाह वशिष्ठ गटकुळ, जिल्हा प्रतिनिधी गणेश पाटील, रोहन पंडित, देवराम परिठे, लक्ष्मण मखर व जुन्नर तालुका अध्यक्ष निलेश काशिद यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक परिषदेच्या मागण्या
प्रलंबित वेतन एकत्र देण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रलंबित मेडिकल बिले मंजूर करून ऑफलाईन पद्धतीने काढली जावीत, 2 मे 2012 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षक, शिक्षकेतर 54 कर्मचार्यांना मान्यता देऊन त्वरीत सेवेत सामावून घ्यावे, पी. एफच्या स्लीपा ऑनलाईन पद्धतीने वितरित कराव्या, अशा अनेक विविध मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
यापुढील काळात जिल्ह्यातील शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वेळोवेळी प्रलंबित कामासाठी जिल्हा परिषदेतील अधिकार्यांशी चर्चा करून ते सोडविले जातील, असे आश्वासन आमदार बाळा भेगडे यांनी दिले. शिक्षक हा समाज घडणीतील महत्वाचा घटक आहे. त्याचे काम तो प्रामाणिकपणे करत असतो. त्याचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर सुटले पाहिजेत. ते सोडविण्यासाठी शिक्षक परिषद कटीबद्द आहे, असे साळुंके यांनी सांगितले. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांशी या विषयावर सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.