पुणे : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या धर्तीवर पोलिसांसाठीही स्वतंत्र मतदारसंघ व त्यातील आमदार दिल्याशिवाय पोलिसांच्या कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावा, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशारा पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेेंद्र कपोते यांनी दिला आहे. संघटनेचा 30 वा वर्धापनदिन रविवारी (दि.13) साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.
पोलिसांनी मागण्या मांडायच्या तरी कशा?
समाजाच्या सुरक्षेची अहोरात्र जबाबदारी पोलिस दलावर आहे. तब्बल 18 ते 20 तास ड्युटी करून पोलिस कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य निभावत आहे. त्यांच्या अनेक समस्या, प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पोलिसांना रहायला घरे नाहीत. त्यांचे पगार तुटपुंजे आहेत. त्यांच्या ड्युटीचे तास अवास्तव आहे. त्यांना कुटुंबाना वेळ देता येत नाही. त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. मुलाबाळांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, इतर सोयीसुविधांच्या समस्या आहेत, त्या सोडवायच्या कशा? असा सवाल करून राजेंद्र कपोते म्हणाले, पोलिसांना संघटना करण्याची परवानगी नाही. त्यांना तक्रारही करता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. त्यामुळे आमची पोलिस मित्र संघटना पोलिसांच्या हक्कासाठी झटत आहे. पोलिसांचे प्रश्न, समस्या सोडवायच्या असतील तर पोलिसांना विधानपरिषदेचा स्वतंत्र मतदारसंघ मिळायला हवा. पोलिसांच्या प्रश्नांवर लढणारा नेता या मतदारसंघातून पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात निवडून गेला तर तो विधिमंडळात पोलिसांच्याप्रश्नी आवाज उठवेल, व पोलिसांच्या समस्या सोडवून घेईल. त्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन हाती घेणार आहोत, असेही कपोते यांनी सांगितले.
पोलीस अधिकार्यांच्या वसाहतीची दुरवस्था
शहरातील पोलीस अधिकार्यांच्या वसाहतीची सद्या दुरवस्था झालेली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही फरक पडलेला नाही. या वसाहतीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचे स्थानिक नगरसेवक तयार आहेत. परंतु, या वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. त्यासाठी त्यांच्याकडे फंड नाही. आणि, ते महापालिकेने दुरुस्ती करावी यासाठी नाहरकत (एनओसी)ही देत नाही. त्यामुळे पोलिस अधिकार्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात हाल होत आहेत, अशी माहितीही राजेंद्र कपोते यांनी दिली. पोलिसांच्या विविध प्रश्नांवर गेल्या 30 वर्षांपासून काम करत असून, अनेक प्रश्न सोडवले आहेत. पोलिस मित्र संघटनेची तीन दशके पोलिसांसाठी काम करण्यात खर्च झालेली आहेत. लवकरच पोलिसांना शिक्षक मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र मतदारसंघ मिळावा यासाठी आंदोलन केले जाणार आहे, असेही कपोते यांनी सांगितले.
काय म्हणाले, राजेंद्र कपोते
* पोलिसांना स्वतंत्र मतदारसंघ व त्यासाठी मतदानाचा हक्क मिळायला हवा.
* पोलिसांच्या कामाचे तास कमी व्हावेत, त्यांना हक्काच्या रजा मिळाव्यात.
* पोलिसांना घरे द्या, त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा द्या.
* संघटीत होता येत नाही तर किमान आमदार निवडण्याची तरी संधी मिळायला हवी.
* राज्यभर तीव्र आंदोलन करू, आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात करणार