शिक्षकांच्या पदभरतीला यंदा कात्री

0

पुणे:- कोरोना विषाणूमुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अर्थव्यवस्था टिकून राहण्यासाठी केंद्रासह राज्यसरकार कठोर पावले उचलत आहे. राज्यसरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील पदभरती वर्षभर बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. त्या मुळे येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारच्या वित्त विभागाने कोरोना विषाणू संसर्गामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेवर उदभवनाऱ्या परीणामांवर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारी विभागातील खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्या नुसार पदभरती आणि बदली संवर्गात निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग वगळता कोणत्याही विभागात नवीन पदभरती करू नये असा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 12 हजार 140 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आला होता. त्या नंतर शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निवड यादीतील 6 हजार उमेदवारांना शाळेत नोकरी मिळाली आहे. उर्वरित जागांवरील शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असताना या पदभरती बंदी मुळे 4 ते 5 हजार जागांची शिक्षक भरती अडकून पडण्याची शक्यता आहे.