शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा

0

नंदूरबार। जिल्ह्याच्या परिस्थितीचा एकूण स्वतंत्र विचार करून नंदुरबार येथील शिक्षकांच्या बदल्यांबाबत शुद्धीपत्रक काढले जाणार असल्याची माहिती राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. ना. रावल यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास विभागाच्या बदली धोरणाबाबत नंदुरबार येथील शिक्षकांनी केलेल्या उपोषणातील प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दि.8 मे सोमवार रोजी बैठकीचे आयोजन केले होते. ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, उपसचिव भालेराव साहेब, कक्ष अधिकारी संजय कुडवे, नंदुरबार जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस.मंगळे, उपजिल्हाधिकारी जोशी, शिक्षणाधिकारी अरुण पाटील, उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, कार्यालय अधीक्षक वाघ, हितेश गोसावी यांच्यासह समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.

बैठकीत पावणे दोन तास चर्चा
नंदुरबार जिल्हा हा भौगोलीक दृष्ट्या दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी बहुल असल्याने व अवघड क्षेत्र जास्त असल्याने या जिल्ह्याच्या परिस्थितीचा एकूण स्वतंत्र विचार करून नंदुरबार येथील शिक्षकांच्या बदल्यांबाबत शुद्धीपत्रक काढावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली होती. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी सदर विषयाबाबत जागरूकता दाखवून तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागास दिले होते. त्यानुसार आयोजित बैठकीत प्रमुख मागण्यांवर सविस्तर तब्बल पावणे दोन तास चर्चा घडवून आणली. येत्या दोन दिवसात शासन स्तरावर या सर्व बाबी लक्षात घेऊन शुद्धीपत्रक काढण्यात येणार असल्याचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी सांगितले. चर्चेत पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांची बाजू मांडली व प्रधान सचिव यांना शुद्धीपत्रक काढण्यास आदेशीत केले. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांचे व सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांचे आभार मानण्यात आले.