नवी दिल्ली : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सुमारे 1 लाख 83 हजार प्राथमिक शिक्षकांवर निर्णयाचा परिणाम होणार आहे. नव्या नियमांनुसार बदल्यांचे सरकारचे अधिकार कायम राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बदल्या होऊ नयेत यासाठी दोन शिक्षक संघटनांनी ही याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (सांगली शाखा) आणि सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने ही याचिका दाखल केली होती. मात्र बदली हा नोकरीचा अविभाज्य घटक आहे, जिथे बदली करण्यात आली तिथे काम करणे हे गरजेचे आहे हे राज्य सरकारचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत या दोनही याचिका फेटाळल्या. न्यायमूर्ती ए के गोयल, न्यायमूर्ती जे जे भानुमती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरकारच्या वतीने अॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी तर शिक्षक संघटनांच्या बाजूने एस बी तळेकर यांनी बाजू मांडली.