शिक्षकांच्या बेमुदत धरण्यास प्रारंभ

0

मुंबई । बालकांच्या व शिक्षकांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनास भेट द्यायला मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांना साधा वेळसुध्दा नाही याचा धिक्कार महाराष्ट्रातील शिक्षकांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत शाळा कृति समितीच्या वतीने आझाद मैदान येथे पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला मुंबई, ठाणे,नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी येथील शिक्षक व शिक्षक आमदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाची एकाही मंत्र्याकडून साधी विचारपूसही न झाल्याने शिक्षकांनी मंत्र्यांचाच धिक्कार करून आपली नाराजी दर्शवली आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा त्वरित घोषित कराव्यात व त्यांची येत्या अधिवेशनात तरतूद करावी. तसेच शासनाच्या प्रचलित नियमांनुसार 1628 शाळांना 20 टक्के अनुदान मिळावे अशा मागण्या आंदोलनामार्फत करण्यात येत आहेत. असे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडूनही आंदोलन
राज्यात सुरू असलेल्या शिक्षण विरोधी धोरणाविरोधात बालदिनाचे निमित्त साधत मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून आझाद मैदानात निषेध आंदोलन केले. महिनाअखेरपर्यंत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर राज्यातील प्रत्येक विभागात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

राज्यभरात आंदोलनाचा इशारा
येणार्‍या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात विना अनुदानीत शिक्षकांचा प्रश्न सभागृहात उठवणार असल्याचे मत औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अनुदानाच्या बाबतीत मुख्यमंत्री यांची वेळ मागवून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विना अनुदानीत शिक्षकांवर अन्याय होत असुन हा प्रश्न येणार्‍या अधिवेशना दरम्यान न सुटल्यास भविष्यात सर्व संघटना यांना एकत्रित करुण व्यापक महाराष्ट्रभर शाळा बंद आंदोलन करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.