पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी यशोधन एंटरप्रायजेस, प्राधिकरण या संस्थेकडील शिक्षकांना घड्याळी प्रती तास 450 रुपये प्रमाणे मानधन देण्याच्या प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे ठेवला होता. मात्र, शिक्षण मंडळाने पालिका शाळेतील शिक्षकांना घड्याळी प्रती तास 54 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा विषयांचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी शिक्षण मंडळास दिल्या.
शैक्षणिक गुणवत्ता वाढ उपक्रम
महापालिका प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषयांचा अभ्यास शिकविण्यासाठी रिक्त पदावर काही शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्या शिक्षकांना राज्य शासनाच्या आदेशानूसार घड्याळी प्रति तास 54 रुपये देण्यात येणार आहे. तर, सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांत शैक्षणिक गुणवत्ता वाढ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
450 ऐवजी 140 रुपये द्या
यशोधन संस्था महापालिकेच्या दोन माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ हा उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी नेमलेल्या शिक्षकांना घड्याळी प्रती तास 450 रुपयांप्रमाणे मानधन देण्याच् या मान्यतेचा विषय स्थायी समिती सभेपुढे होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विषय शिकविणार्या शिक्षकांना 54 प्रतितास आणि गुणवत्ता वाढ उपक्रमातंर्गत शिक्षकांना 450 प्रतितास असा दुजाभाव का? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढ हा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. तसेच, दोन्ही विषयाचे फेरप्रस्ताव पुढील स्थायी समितीपुढे सादर करावेत. याशिवाय 54 रुपये प्रतितास मानधनावर नेमलेल्या शिक्षकांना किमान वेतन दरानूसार 100 ते 150 रुपये देण्यात यावेत. असा फेरप्रस्ताव दाखल करावा, अशा सूचना सावळे यांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकार्यांना दिल्या आहेत.